तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या अण्णाद्रमुक पक्षाचं निवडणूक चिन्ह निवडणूक  आयोगाकडून गोठवण्यात आलं आहे. अण्णाद्रमुकमधल्या पन्नीरसेल्व्हम् आणि शशिकला संघर्षाचती याला पार्श्वभूमी आहे. चेन्नईमधल्या आर के नगर या भागातल्या पोटनिवडणूकीसाठी पक्षाचं चिन्ह आपल्याला मिळावं यासाठी या दोन्ही गटांनी प्रयत्न चालवले होते पण आता या दोन्ही गटांना पक्षाचं चिन्ह वापरता येणार नाही असं निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.

जयललितांच्या निधनानंतर अण्णाद्रमुक पक्षामध्ये सुरू झालेल्या सत्तास्पर्धेत जयललितांच्या अत्यंत जवळच्या शशिकला आणि जयललितांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्रीपदाचा भार वाहणारे ओ. पन्नीरसेल्व्हम् यांच्यात मोठा संघर्ष निर्माण झाला होता. आपल्या प्रभावी राजकीय ताकदीचा वापर करत शशिकलांनी या स्पर्धेत बाजी मारली होती पण बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सुप्रीम कोर्टाने त्यांना तुरूंगवासाची शिक्षा ठोठोवल्याने त्यांना मोठा हादरा बसला होता. पण तरीही त्यांच्यात गटातल्या पलानीस्वामी यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात त्या यशस्वी झाल्या होत्या.

चेन्नईमधल्या एका पोटनिवडणुकीत अण्णाद्रमुकचं निवडणूक चिन्ह कुठल गट वापरणार यावरून या दोन्ही गटामध्ये वाद सुरू होता. या चिन्हावर हक्क सांगण्यासाठी दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर निवडणूक आयोगाकडे मोर्चेबांधणी करण्यात आली होती. पण आता कोणालाही हे चिन्ह वापरता येणार नाही आहे. निवडणूक आयोगाचे निर्देश आम्हाला मिळाले नसल्याची भूमिका पन्नीरसेल्व्हम् गटाने घेतली आहे. तर निवडणूक चिन्ह आम्हाला मिळालं नाही तरी त्याचा आर के नगर मधल्या पोटनिवडणुकीतल्या आमच्या कामगिरीवर काहीही परिणाम होणार नसल्याचा दावा शशिकलांच्या गटाने केला आहे