मतदानाची प्रक्रिया संपेपर्यंत निकालाचा अंदाज वर्तवण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. मतदान पूर्ण होईपर्यंत इलेक्ट्रॉनिक तसेच प्रिंट माध्यमांना एग्जिट पोल दाखवता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्याबरोबरच निवडणूक निकालाचे ज्योतिषाचार्यांनी भविष्य वर्तवणे किंवा टॅरोट कार्डाच्या साहाय्याने भविष्य वर्तवण्यावर पूर्णतः बंदी घालण्यात आली असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

पाच राज्यांमध्ये नुकताच निवडणुका झाल्या या काळात एग्जिट पोलवर बंदी असून देखील काही वेबसाइटने निकालाचे अंदाज मतदानाच्याच काळात प्रसिद्ध केले होते. त्यांना कायदेशीर कारवाईला देखील सामोरे जावे लागले होते. तसेच या काळात काही वाहिन्यांनी भविष्याचे जाणकार आणि टॅरोट कार्ड रिडरला आपल्या पॅनल चर्चेसाठी आणले आणि त्यांनी निकालाचे अंदाज वर्तवले. यापुढे हे करणे बेकायदा ठरणार असून असे वागणाऱ्यास कठोर शिक्षा दिली जाईल असे न्यायालयाने सांगितले. मतदान संपेपर्यंत कुठल्याही प्रकारे निकालाचा अंदाज देण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.

याबाबत निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्वे सर्व माध्यमांना पाठवली आहेत. लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १२६ अ नुसार कुठल्याही व्यक्तीने अथवा संस्थेनी, प्रकाशकाने कुठल्याही परिस्थितीमध्ये निकालाचे अंदाज वर्तवू नये असे सांगण्यात आले आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर निवडणुकावेळी ४ फेब्रुवारीला सकाळी सात पासून ते ९ मार्चला साडेपाच पर्यंत एग्जिट पोल प्रसिद्ध करण्यावर बंदी घालण्यात आली होती. तरी देखील काही वृत्तवाहिन्यांनी एग्जिट पोल प्रसिद्ध केल्याचे आमच्या निदर्शनास आले असे निवडणूक आयोगाने म्हटले. एका चॅनेलने एग्जिट पोल असे न म्हणता तज्ज्ञांकडून अंदाज वर्तवून घेतले. हे देखील नियमांचे उल्लंघन असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले. भविष्यात अशी वर्तणूक करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे निवडणूक आयोगाने म्हटले.