हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसची घराणेशाही आणि चौतालांकडून केला जाणारा बळाचा वापर यावर जोरदार हल्ला चढविला. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडेरा यांच्या भूखंड घोटाळ्याचा उल्लेख करून मोदी यांनी काँग्रेसच्या घराणेशाहीच्या राजकारणावर टीका केली. तर बळाचा वापर करणाऱ्या चौतालांना धुडकावून लावण्याचे आवाहनही मोदी यांनी मतदारांना केले. वडेरा यांचे भूखंड व्यवहार निर्दोष असल्याचा निर्वाळा देणाऱ्या हुडा सरकारच्या कृतीची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणीही मोदी यांनी केली.
हरयाणावर ज्यांनी यापूर्वी राज्य केले ते बळाचा वापर करीत असत, त्यामुळे अशा शक्तींना मतदारांनी नाकारण्याची गरज आहे. मतदारांनी त्यांना नाकारल्यास सर्वसामान्य जनतेला चांगला कारभार पाहावयास मिळेल, ज्येष्ठांना सन्मान मिळेल आणि महिलांना सुरक्षा देता येईल, असे मोदी यांनी माजी मुख्यमंत्री चौताला यांच्या कुटुंबीयांचा संदर्भ देऊन सांगितले. स्पष्ट बहुमतातील सरकार असल्यास हरयाणाला बळाचा वापर करणाऱ्या शक्तींपासून मुक्त करता येईल, असेही ते म्हणाले.
रॉबर्ट वडेरा आणि डीएलएफ कंपनीतील भूखंड व्यवहार कायदेशीर असल्याचा निर्वाळा देणाऱ्या काँग्रेस सरकारच्या निर्णयाची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घ्यावी, असे मोदी म्हणाले. निवडणुकीनंतर वडेरा यांना निर्दोषत्व बहाल केले जाणार नाही याची हुडा सरकारला जाणीव आहे, त्यामुळे सरकारने आता अशा प्रकारचा निर्णय घेण्याचे धाडस केले.
 काँग्रेसच्या नेतृत्वाने हुडा यांच्यावर दबाव आणला असावा असे वाटते. निवडणूक आयोग राज्य सरकारच्या निर्णयाची गंभीर दखल घेईल, असेही पंतप्रधान म्हणाले.

आरोप सिद्ध झाल्यास त्वरित पदत्याग करू – हुडा
नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडेरा यांच्या भूखंड व्यवहाराशी आपल्या सरकारचा संबंध नाही. या व्यवहारात इंचभरही जमीन असल्याचे कोणी सिद्ध केल्यास आपण त्वरित पदत्याग करण्यास तयार आहोत, असे हुडा म्हणाले. रॉबर्ट वडेरा यांच्या भूखंड व्यवहाराशी आपल्या सरकारचा संबंध नाही, आमच्यावर जे आरोप करीत आहेत ते दिशाभूल करीत आहेत, सदर प्रकरण तडीस न्यावयाचे असल्यास ते या प्रकरणाच्या चौकशीसाठी लोकायुक्तांकडे दाद मागू शकतात, असे हरयाणाचे मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांनी म्हटले आहे.