म्यानमारमध्ये ऐतिहासिक सार्वत्रिक निवडणुका होत असून त्यात मतदारांचा कमालीचा उत्साह व आशादायी वातावरण आहे. सध्या तेथे असलेली लष्कराची पकड या निवडणुकीने ढिली होणार का, या प्रश्नाचे उत्तर या निवडणुकीतून मिळणार आहे. विरोधी पक्ष नेत्या आँग सान स्यू की यांना सहज विजय मिळण्याचे संकेत मिळाले आहेत.

म्यानमार हा पन्नास वर्षे लष्करी राजवटीखाली असलेला देश असून एकूण ३ कोटी मतदार पात्र आहेत. त्यांनी प्रथमच मतदान केले. आतापर्यंतच्या या सर्वात खुल्या निवडणुका आहेत. तेथील लष्करी राजवटीचा अंकुश झुगारणाऱ्या लोकशाहीवादी नेत्या आँग सान स्यू की या निवडणुकीत यश मिळवतील अशी आशा आहे. केसात माळलेले विशिष्ट प्रकारचे फूल व हसरा चेहरा ही त्यांची छबी आजही तशीच होती. त्यांनी त्यांच्या निवासस्थानाजवळच्या केंद्रात जाऊन मतदान केले. शेकडो पत्रकारांनी त्यांच्याभोवती गराडा घातला व नंतर लगेच मतदान करून त्या पत्रकारांशी न बोलता निघून गेल्या.
बौद्ध मंदिरे, शाळा व सरकारी इमारतीत मतदानासाठी सकाळपासून रांगा लागल्या होत्या. निवडणूक निरीक्षकांच्या मते आजचा दिवस हा उत्साह व उत्सुकतेचा होता. म्यानमारविषयक तज्ज्ञ रिचर्ड होर्से यांनी सांगितले की, विरोधी पक्षांना मतदान करण्याची संधी प्रथमच मिळत आहे. एकूण ९० पक्ष मैदानात असून स्यू की यांचा नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी व सत्ताधारी युनियन सॉलिडॅरिटी डेव्हलपमेंट पार्टी यांच्यात खरी लढाई आहे. इतर पक्ष हे वांशिक अल्पसंख्याकांचे आहे. म्यानमारमधील ५.२ कोटी लोकसंख्येत ४ कोटी वांशिक अल्पसंख्याक आहेत.
ओहमार या मतदाराने सांगितले की, मतदानासाठी येताना उत्साह होता, रात्रभर मी झोपलो नाही. सकाळी उठून मतदानाला आलो, देशात बदल हवा आहे. आँग सान स्यू की जिंकतील अशी आशा आहे पण त्यासाठी निवडणुका खुल्या वातावरणात व्हायला हव्यात. म्यानमारच्या राज्यघटनेनुसार २५ टक्के जागा लष्कराला राखीव असतात. पहिली पन्नास वर्षे तेथे लष्कराची निरंकुश सत्ता होती.