उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पदभार स्वीकारल्यापासून अनेक सरकारी कार्यालये आणि विभागांना अचानक भेट देत आहेत. आता मुख्यमंत्र्यांसारखीच अचानक भेट उत्तर प्रदेशातील वीज विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. या अचानक देण्यात आलेल्या भेटीमुळे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यादव यांना चांगलाच ‘शॉक’ बसला. वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या अचानक भेटीमुळे मुलायम सिंग यादव यांनी तब्बल ४ लाख रुपयांचे वीज बिल थकवल्याची माहिती ‘उजेडात’ आली.

मुलायम सिंग यादव त्यांच्या इटवाहतील बंगल्यामध्ये जास्त वीज वापरली जात असल्याचे वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या अचानक भेटीमुळे समोर आले. मुलायम सिंग यादव त्यांना परवानगी देण्यात आलेल्या विजेपेक्षा अधिक वीज वापरत आहेत, असे वीज विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. मुलायम सिंग यादव यांच्या बंगल्याला ५ किलोवॅट वीज वापरण्याची परवानगी आहे. मात्र या मर्यादेचे आतापर्यंत किमान आठवेळा उल्लंघन झाले आहे.

वीज विभागाकडून मुलायम सिंह यादव यांना थकित रक्कम भरण्यासाठी महिन्याभराचा कालावधी देण्यात आला आहे. व्हीआयपी कल्चरविरोधात मोदी सरकारने पावले उचलल्यानंतर उत्तर प्रदेशातील योगी सरकारनेदेखील व्हीआयपी कल्चर संपवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मुलायम सिंह यादव यांच्या बंगल्याला देण्यात आलेली भेट याच प्रयत्नांचा भाग होती.

वीजेची चोरी करण्यासाठी सध्या वीज विभागाकडून प्रयत्न सुरु आहेत. ‘वीज चोरी रोखण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासोबतच वीजेचा अतिरिक्त वापर करण्यांचा शोध घेण्यासाठी आणि वीज बिल थकवणाऱ्यांकडून थकलेल्या वीज बिलाची वसुली करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत,’ अशी माहिती वीज विभागाचे अधिकारी आशुतोष वर्मा यांनी देल्याचे एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीने म्हटले आहे.