राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव राज्यसभेत मंजूर करून घेताना भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारवर मंगळवारी नामुष्कीची वेळ ओढवली. कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणात काळ्या पैशाचा उल्लेख नसल्याबद्दल खेद व्यक्त करणारी दुरुस्ती आभार प्रस्तावात मांडली. त्यावर राज्यसभेत मतदान होऊन ती ११८ विरुद्ध ५७ मतांनी स्वीकारली गेली. यामुळे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील अंतिम आभार प्रस्तावात येचुरी यांनी सुचविलेली दुरुस्ती दाखल करावी लागली.
आभार प्रस्तावावरील चर्चेला मोदी यांनी मंगळवारी राज्यसभेत उत्तर दिले. यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी आला. प्रथेप्रमाणे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर कधीही मतदान घेतले जात नाही. त्यापार्श्वभूमीवर प्रस्तावात सूचविण्यात आलेल्या दुरुस्त्या विविध सदस्यांनी मागे घेतल्या. मात्र, येचुरी यांनी सुचविलेली २३३ क्रमांकाची दुरुस्ती मागे घेण्यास नकार दिला. संसदीय कामकाजमंत्री वैंकय्या नायडू यांनी त्यांना दुरुस्ती मागे घेण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी आभार प्रस्तावावर कधीच मतदान घेतले जात नाही, असे अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, सभागृहाचे सदस्य या नात्याने दुरुस्ती सुचविण्याचा आपल्याला अधिकार आहे, असे येचुरी यांनी स्पष्ट केले आणि ते त्यावर कायम राहिले. यानंतर वैंकय्या नायडू यांनी कॉंग्रेसचे गटनेते गुलामनबी आझाद यांच्याकडेही हस्तक्षेप करण्याची मागणी केली. पण त्यांनीही त्यास नकार दिल्यावर येचुरी यांच्या दुरुस्तीवर मतदान घेण्यात आले आणि ही दुरुस्ती बहुमताने स्वीकारण्यात आली.