रेल्वेत थेट परकीय गुंतवणुकीच्या प्रस्तावास लाल झेंडा दाखवून त्याऐवजी भविष्य निर्वाह निधीची रक्कम तसेच रेल्वेच्या अखत्यारीतील जमिनीचा व्यापारी तत्त्वावर वापर करून निधी उभारण्याची सूचना ‘नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेज’ या संघटनेने केली आहे.
संघटनेचे सरचिटणीस एम. राघवय्या यांनी या संदर्भात ही सूचना केली. आजच्या घडीला रेल्वेचे सुमारे १३ लाख कर्मचारी असून रेल्वेसाठी व्यापक निधी उभारण्यासंदर्भात त्यांनी पुढे येण्यासाठी आम्ही त्यांना आवाहन करू, असे राघवय्या यांनी सांगितले. याखेरीज, रेल्वेच्या ताब्यात मोठय़ा प्रमाणावर रिक्त जमीन असून महसूल उभारणीसाठी रेल्वे त्या जमिनीचाही व्यापारी तत्त्वावर वापर करू शकेल, असे त्यांनी नमूद केले. असे करण्यात आले, तर नियमित महसूल प्राप्तीचा तो एक कायमचा मार्ग ठरून परकीय गुंतवणुकीची गरजही भासणार नाही, असे राघवय्या म्हणाले.रेल्वेत थेट परकीय गुंतवणुकीमुळे देशाच्या सुरक्षेशी तडजोड केल्यासारखे होईल आणि त्यामुळे ते योग्य ठरणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.