निवृत्त झाल्यानंतर ‘पेन्शन’ मिळविण्यासाठी करावी लागणारी तंगडतोड आणि प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. लोकांना वेळेत निवृत्तिवेतन मिळावे आणि त्यासाठी त्यांना पायपीट करावी लागू नये यासाठी ‘पेन्शन पेमेंट ऑर्डर’ निवृत्तीच्या दिवशीच संबंधित व्यक्तीस देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. सरकारी कर्मचाऱ्यास देण्यात येणाऱ्या अन्य रकमांबरोबरच हा ‘प्रदान आदेश’ दिला जाणार आहे.
सध्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या सुमारे ३० लाख निवृत्तिवेतनधारकांना या आदेशाचा फायदा होणार आहे. त्यादृष्टीने केंद्रीय कार्मिक विभागाने सर्व बँकांना आणि लेखा विभाग नियंत्रकांना नव्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. लाखो कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होईल, असा अंदाज आहे.

सध्याची पद्धती
निवृत्त होणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याने प्रतिज्ञापत्र भरणे
निवृत्तिवेतन देण्यासाठी अधिकृत करण्यात आलेल्या सरकारी बँकेकडे ते सादर करणे
प्रतिज्ञापत्राची खातरजमा करून निर्धारित अवधीनंतर वेतन वितरणास सुरुवात
वेतन दिरंगाईमागील कारणे
निवृत्तिवेतनधारकाकडून संबंधित कागदपत्रे बँकेकडे हस्तांतरित केल्याचे कळण्यास होणारा विलंब निवृत्तिवेतनधारकांना बँकेत कागदपत्रे सादर करण्यास लागणारा वेळ

बदल काय?
निवृत्तिवेतन सुरू व्हावे यासाठी बँकेत फेरी नको
केंद्राच्या निवृत्तिवेतन कार्यालयाकडून प्रदान आदेशाची प्रत संबंधित कर्मचाऱ्यास निवृत्तीच्या दिवशी देण्यात येणार
सदर आदेश प्रत बँकेला दाखविताच वेतनास सुरुवात
प्रदान आदेशाची प्रत कार्यालयाऐवजी बँकेकडूनच हवी असल्यास तशी मागणी करण्याची सुविधा