नवीन प्राप्तिकर परतावा अर्ज भरताना त्यात परदेशवारीपासून ते बँक खात्यांसंबंधात भरमसाठ तपशील भरण्याची सक्ती मागे घेतली जाण्याची चिन्हे आहेत. प्राप्तिकर परतावा अर्ज भरताना सरकार अतिरेकी चौकसपणा दाखवत असल्याची टीका सर्वच थरांतून सुरू झाल्याने सरकारने हा अर्ज आता अगदी साधासोपा करण्याचे संकेत शनिवारी दिले आहेत. त्यामुळे करदात्यांच्या मनावरील माहितीची जंत्री भरण्याचे दडपण कमी होणार आहे.
महसूल सचिव शक्तिकांत दास यांनी शनिवारी प्रेस ट्रस्टला सांगितले की, नव्या प्राप्तीकर परतावा अर्जात मागितलेल्या तपशीलांचा पूर्ण फेरविचार करण्याचे आदेश अर्थमंत्र्यांनी वॉशिंग्टनहून दिले आहेत.
हा अर्ज भरणे अधिकच कठीण आणि वेळखाऊ होणार आहे, अशी टीका कर सल्लागारांनीही केली होती.
काळ्या पैशाला आळा घालण्याचे कारण सांगत शुक्रवारी केंद्रीय थेट कर मंडळाने (सीबीडीटी) ही नवी अर्जपद्धती जाहीर केली होती. त्यानुसार आयटीआर-१ आणि आयटीआर-२ या अर्जात करदात्याला गेल्या वित्तीय वर्षांतील त्याच्या नावावर असलेल्या बँक खात्यांचा तपशील द्यायला लागणार होता. त्या तपशीलात बँकेचे नाव, खातेक्रमांक, पत्ता, बँकेचा आयएफसी कोड, सहखातेदार असल्यास त्याची माहिती मागितली होती. परदेशवारीच्या तपशीलात करदात्याचा पारपत्र क्रमांक, पारपत्र कुठून काढले, कोणत्या देशांचा दौरा केला, त्या देशातला हा कितवा प्रवास होता, खर्च कसा केला; ही जंत्री मागितली होती.
यातील अनेक तपशील हा अन्य मार्गाने सरकारला मिळतच असताना सरकारने ही प्रक्रिया किचकट केली, याकडे आंतरराष्ट्रीय करतज्ज्ञ टी. पी. ओसवाल यांनी लक्ष वेधले.

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्राप्तीकर परतावा अर्जाबाबतच्या आक्षेपांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या अर्जातील नव्या तपशीलांच्या मागणीबाबत फेरविचार होणार आहे. ही प्रक्रिया सोपी व्हावी, हाच आमचा मुख्य हेतू राहील.
– निर्मला सीतारामन, केंद्रीय वाणिज्य मंत्री