राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यासमोरील संकटाची मालिका संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. मुलगी मिसा भारती आणि जावई शैलेश यांचे सनदी लेखापाल राजेश अग्रवाल यांच्याविरोधात इडीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. राजेश अग्रवाल काळा पैसा पांढरा करण्यात सामील असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.

चार बनावट कंपन्यांच्या (शेल) माध्यमातून पैसे घेऊन त्याच पैशातून दिल्लीतील फार्म हाऊस खरेदी केल्याचा मिसा आणि शैलेश यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी इडीने बनावट कंपनीचे मालक जैन बंधू आणि शैलेश यांचे सनदी लेखापाल राजेश अग्रवाल यांना अटक केली आहे. आतापर्यंतच्या चौकशीत बनावट कंपनीच्या माध्यमातून भाग हस्तांतरीत करण्यासाठी राजेशने शूल्क घेतल्याचे निर्दशनास आले होते.

इडीने मिशेल कंपनीला पैसे देणाऱ्या बनावट कंपनीचे मालक व्ही.के.जैन आणि एस.के.जैन यांना अटक केली होती. याच आधारावर सनदी लेखापाल राजेश अग्रवालला अटक केली होती. तर मिसा आणि शैलेश यांच्याकडे बेनामी संपत्ती असल्याचा प्राप्तिकर विभागाला संशय आहे. याप्रकरणी गेल्या महिन्यात प्राप्तिकर विभागाने मिसा भारतीची चौकशी केली आहे.