एप्रिल महिन्यापासून भविष्य निर्वाह निधी (पीएफ) काढणे ही प्रक्रिया अत्यंत सोपी होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही नवी प्रक्रिया येणार असल्याची चर्चा होती. एप्रिल महिन्यापासून प्रत्यक्षात ही योजना लागू करण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज केल्याच्या तीन तासांमध्ये तुम्हाला तुमचा पीएफ मिळणार आहे. अर्ज केल्यानंतर केवळ तीन तासांच्या आत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. उल्लेखनीय बाब म्हणजे, हा पैसा काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या कंपनीला अर्ज करण्याची गरज पडणार नाही. या निर्णयामुळे ५ कोटीहून अधिक लोकांना फायदा होणार आहे.

इपीएफओचे आयुक्त वी. पी. जॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सर्व इपीएफओ कार्यालय एका सॉफ्टवेअरने जोडून घेण्याचे काम सुरू आहे. मार्चच्या शेवटी हे काम संपेल आणि सर्व इपीएफओ कार्यालय मुख्यालयाच्या सेंट्रल सर्वरला जोडले जातील. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून ऑनलाइन पीएफ विड्रॉअल सुरू करण्यात येईल.

इपीएफओच्या वेबसाइटवर करा अर्ज

ऑनलाइन पीएफ काढण्यासाठी इपीएफओच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येईल. जर सदस्याचा मृत्यू झाला तर वीम्यासाठी दावा देखील याच ठिकाणी करता येणार आहे. यासाठी ऑफिसमध्ये जाण्याची गरज पडणार नाही.

सध्या काय आहे प्रक्रिया?

सध्या पीएफ काढण्यासाठी अर्ज भरावा लागतो आणि हा अर्ज कंपनीच्या मनुष्यबळ विकास विभाग (एचआर) ला द्यावा लागतो. त्यानंतर हा अर्ज कंपनीकडून इपीएफओ कार्यालयात जातो. त्यानंतर पीएफ क्लेम सेटलमेंट होते. या प्रक्रियाला बराच वेळ जातो.

सदस्य संख्या

ईपीएफओच्या वेबस्थळावर नमूद तपशिलानुसार, आजवर ५.६ कोटी खातेधारकांना सार्वत्रिक खाते क्रमांक देण्यात आला असून, त्यापैकी ९२.८८ लाख खातेधारकांना त्यांचे आधार क्रमांक आणि २.७५ कोटी खातेधारकांनी बँक खात्याचा तपशील प्रस्तुत केला आहे. त्यातून ईपीएफओने आधार क्रमांक सादर केलेल्या ६४.४७ लाख खात्यांना तपासणीअंती अधिकृत केले आहे, तर बँक खातेविषयक तपशील असलेल्या १.९ कोटी खात्यांना वैध ठरवून, त्यांचे सार्वत्रिक खाते क्रमांक सक्रिय केले आहेत. त्यामुळे सर्व खातेधारकांबाबत ही प्रक्रिया पूर्णत्वास नेण्यासाठी मार्चपर्यंत वेळ जाण्याचा अंदाज आहे.

केव्हा काढता येईल पीएफ?

नोकरी नसल्यास ६० दिवसानंतर पैसे काढता येतात. जर नोकरी असेल तर पीएफ काढता येत नाही.