युरोपीय संसदेचे ब्रिटनला आवाहन

ब्रेग्झिटचा निर्णय घेतलाच आहे तर आता ब्रिटनने या आठवडय़ातच युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू करावी, असा आग्रह युरोपीय संसदेचे प्रमुख मार्टिन शुल्टझ यांनी धरला आहे.

जर्मन वृत्तपत्र ‘बाइल्ड अ‍ॅम सॉनटॅग’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले, की ब्रेग्झिटमुळे अस्वस्थता आहे, त्यामुळे नोकऱ्या धोक्यात आहेत. परिणामी, ब्रिटनने बाहेर पडण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. ब्रिटिश कॉन्झर्वेटिव्हजने जे डावपेच केले आहेत ते व्यथित करणारे आहेत. आता ब्रिटिश सरकारने तातडीने देशाला महासंघातून माघारी घ्यावे. मंगळवारपासून ही प्रक्रिया सुरू करावी. युरोपीय संसदेतील चार प्रमुख गटांनी पंतप्रधान कॅमेरून यांना तातडीने बाहेर पडण्यासाठी मंगळवारपासूनच तयारी करण्यास सांगितले. अनिश्चितता संपली पाहिजे व युरोपीय महासंघाची उरलेली एकता कायम राहिली पाहिजे. युरोपीय समुदायातून ब्रिटन बाहेर पडल्याशिवाय आता या दोघांमध्ये दुसरे कुठले वेगळे संबंध प्रस्थापित होऊ शकत नाहीत. बाहेर पडण्यासाठी ब्रिटनला लिस्बन करारातील कलम ५०चा वापर करावा लागेल जे कधीही वापरण्यात आलेले नाही. त्यासाठी युरोपीय मंडळाच्या सदस्य देशांना कळवावे लागेल व या वाटाघाटींसाठी दोन वर्षांचा कालावधी आहे. युरोपीय समुदायाची शिखर बैठक मंगळवार व बुधवारी होणार असून, त्यात ब्रेग्झिटच्या परिणामांचा विचार केला जाणार आहे. युरोपीय संसदेचे खास अधिवेशनही होणार आहे. युरोपीय समुदायातील सहा देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक काल बर्लिन येथे झाली, त्यातही ब्रिटनने आता तातडीने महासंघातून बाहेर पडावे असे म्हटले आहे.