अमेरिकी इंटरनेट कंपनी गुगलने इंटरनेट सर्च इंजिन क्षेत्रातील आपल्या आघाडीचा गैरफायदा घेतल्याचा आरोप युरोपीय महासंघाने ठेवला असून गुगलच्या अँड्रॉइड या मोबाइल फोन ऑपरेटिंग सिस्टीमचा तपास सुरू केला आहे.
या संदर्भात युरोपीय महासंघाने गुगलला रीतसर आरोपांची यादी धाडली आहे. गुगलवर विविध व्यापारी उत्पादने आणि सेवांमधील तुलनेविषयी माहिती शोधताना स्वत: गुगलच्या उत्पादनांना झुकते माप देणारी माहिती शोधणाऱ्याला पद्धतशीरपणे पुरवली जाते, असा दावा युरोपीय महासंघाने केला आहे. त्यामुळे गुगलने युरोपीय महासंघाच्या ग्राहकांच्या विश्वासासंबंधी कायद्यांचा भंग केला असल्याचा महासंघाचा आरोप आहे. या संदर्भात काही कंपन्यांनी २०१० साली गुगलविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर सुरू झालेल्या तपासाला आता नवे वळण मिळाले आहे.
 गुगलने मोबाइल फोन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांबरोबर केलेल्या करारांचीही आता चौकशी केली जाईल. गुगलने या कंपन्यांना आपली अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम वापरण्यासाठी दबाव आणला होता का, आणि अँड्रॉइडच्या सुधारित आवृत्ती वापरण्यास मज्जाव केला होता का, हेही तपासण्यात येईल.या आरोपांना कायदेशीर उत्तर देण्यासाठी गुगलला दहा आठवडय़ांचा कालावधी दिला आहे.