युरोपचे रोसेटा अंतराळयान १२ नोव्हेंबरला धुमकेतूवर यंत्रमानवरूपी प्रयोगशाळाच उतरवणार असून अवकाशातील अत्यंत खोलवरची ही पहिलीच मोहीम आहे. ६७ पी चुरीयुमोव-गेरासीमेन्को या धूमकेतूवर युरोपीय अवकाश संस्थेचे यान उतरणार आहे.
पृथ्वीपासून ४५० दशलक्ष किलोमीटर अंतरावर ही मोहीम पूर्णत्वास जाणार आहे. रोसेटा यान त्याचे फिली नावाचे लँडर धूमकेतूवर उतरवणार आहे, हा धूमकेतू सूर्याभोवती सेकंदाला १६.७९ कि.मी वेगाने ( सेकंदाला १०.४ मैल)फिरत आहे.
धूमकेतू ६७ पी हा रबरी बदकासारखा असून त्याची मान निमुळती भासते. युरोपीय अवकाश संस्थेने यान उतरवण्यासाठी साइट जे (ठिकाण) निश्चित केली असून दुसरी पर्यायी साईट सी (ठिकाण) निश्चित करण्यात आली आहे. जर सगळे योजनेप्रमाणे पार पडले तर १२ नोव्हेंबरला फिली हे लँडर धूमकेतूच्या केंद्रापासून २२.५ कि.मी अंतरावर  सात तासांनी  उतरेल. एका बाजूने रोसेटाला संदेश जाण्यास २८ मिनिटे व २० सेकंद लागतात त्यामुळे ते यान उतरले की नाही ते ग्रीनिच प्रमाणवेळेनुसार ४ वाजता कळेल तर दुसऱ्या पर्यायी जागेवर उतरवायचे ठरवले तर ग्रीनिच प्रमाणवेळेनुसार १.०४ वाजता धूमकेतूच्या केंद्रापासून १२.५ कि.मी अंतरावर चार तासांनी उतरेल.  यात ते यान उतरले की नाही हे कळायला ग्रीनिच प्रमाणवेळेनुसार ५.३० वाजतील. रोसेटा यानावर कॅमेरे व संवेदक असून त्याने अनेक छायाचित्रे टिपली आहेत. फिलीवर असलेल्या १० उपकरणांमुळे आणखी मोठे शोध लागण्याची अपेक्षा आहे. धूमकेतू हे बर्फाळ असतात व ते सौरमालेची निर्मिती ४.६ अब्ज वर्षांपूर्वी झाली तेव्हा तयार झाले व त्यामुळेच पृथ्वीवर जीवसृष्टी आली असे सांगितले जाते. धूमकेतू ६७ पी हा सूर्यप्रदक्षिणा साडेसहा वर्षांत पूर्ण करतो. सहा अब्ज किलोमीटरचे अंतर  कापून हे यान तेथे पोहोचत आहे. धूमकेतू व रोसेटा यान १३ ऑगस्ट २०१५ रोजी सूर्यापासून सर्वात जवळ म्हणजे १८.५० कोटी किलोमीटर अंतरावर असणार आहे.