केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल आणि विस्तार झाला त्यानंतर सुरेश प्रभू यांच्याकडे असलेले रेल्वे खाते हे पीयुष गोयल यांना देण्यात आले तर सुरेश प्रभू यांच्याकडे वाणिज्य खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. रेल्वेमंत्रीपद स्वीकारल्यापासून ते राजीनामा देईपर्यंतची माझी कामगिरी तुम्ही बघू शकता, मागील तीन वर्षांमध्ये रेल्वे अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी झाले आहे. असे असले तरीही एक जरी अपघात झाला तरीही वेदना होतातच म्हणूनच मी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला अशी प्रतिक्रिया सुरेश प्रभू यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर काही तासांतच त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘कैफियत एक्स्प्रेस’ च्या अपघातानंतर सुरेश प्रभू यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरेश प्रभू यांना ‘तूर्तास थांबा’ इतकेच सांगितले होते. सुरेश प्रभू यांचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारला नसला तरीही मंत्रिमंडळ फेरबदल आणि विस्ताराच्या वेळी त्यांचे खाते दुसऱ्या मंत्र्याला देण्यात येईल हे निश्चित मानले जात होते. अपेक्षेप्रमाणे रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात सुरेश प्रभू यांच्याकडे असलेले रेल्वे खाते हे पीयुष गोयल यांना देण्यात आले आहे. सुरेश प्रभू हे आता केंद्रीय वाणिज्य मंत्री म्हणून काम करणार आहेत.

माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यावर ‘कलिंगा उत्कल एक्प्रेस’चा अपघात झाल्यानंतर विरोधकांनी टीकेचे ताशेरे झाडले होते. तसेच त्याचवेळी राजीनाम्याचीही मागणी केली होती. या अपघातात २० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता तर १५० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले होते. रेल्वे अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचे तपास अहवालात समोर आले होते. यानंतर चार अधिकाऱ्यांवर कारवाईही करण्यात आली होती.

या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असतानाच ‘कैफियत एक्स्प्रेस’चा अपघात झाला. कैफियत एक्स्प्रेसच्या अपघातानंतर सुरेश प्रभू यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे राजीनामा सादर केला होता, पण त्यांनी तो स्वीकारला नव्हता. अखेर रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात पीयुष गोयल यांना रेल्वे खाते देण्यात आले.