माझे दुर्देव आहे की, मी कष्ट करतो म्हणून माझ्यावर टीका केली जाते. परंतु, कष्ट करणे हा जर गुन्हा असेल तर , भारतातील १२५ कोटी जनतेसाठी तो करण्यास मी तयार आहे. माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण भारतीय जनतेसाठी समर्पित असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते शनिवारी शांघायमधील भारतीय समुदायातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमासाठी चीनमधील ५००० भारतीय नागरिक उपस्थित होते. यावेळी मोदींनी उपस्थित भारतीयांशी अनेक विषयांवर संवाद साधला.
माझ्याकडून देशाचे नुकसान होईल, अशी कोणतीही चूक घडणार नाही, यासाठी मला तुमच्या आशीर्वादांची गरज असल्याचेही मोदींनी उपस्थित भारतीयांना सांगितले. उद्या तुम्हाला रविवारची सुट्टी असेल. परंतु, मला मंगोलियात काम करायचे आहे. भारतीय पंतप्रधानांसाठी रविवारीसुद्धा मंगोलियन संसदेचे कामकाज सुरू राहणार आहे, याची कल्पना तरी कोणी केली होती का, असे मोदींनी यावेळी सांगितले.
बदल हे एका रात्रीत घडत नाहीत. चीनला बदलण्यासाठी तब्बल ३० वर्षे लागली. या ३० वर्षांमध्ये चीन एका नव्या उंचीवर जाऊन पोहचला आहे. सध्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मते भारत ही सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. मात्र, आमची स्वप्ने मोठी असली तरी, आमचे पाय जमीनीवरच असल्याचे मोदींनी सांगितले. चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय नागरिक राहतात. त्यामुळे त्यांचा आणि भारतातील लोकांचा संवाद वाढला पाहिजे. चीनमधील लोकांनाही भारताविषयी खूप उत्सुकता आहे. त्यामुळे चीनमधील भारतीयांची जबाबदारी अधिक वाढते. त्यांनीच चीनी जनतेला भारताची ओळख करून देण्यात मदत केली पाहिजे, असे मोदी यांनी म्हटले.
सध्या जग वेगाने बदलत आहे. गेल्या वर्षी याचवेळी भारतासह चीनमधील भारतीयांनाही कोण सत्तेत येणार याची उत्सुकता लागली होती. त्यावेळी मोदींना गुजरातबाहेर कोण ओळखते, अशी टीका वारंवार करण्यात येत होती. मात्र निकालांमुळे टीकाकारांना योग्य ते उत्तर मिळाल्याचे मोदींनी सांगितले.
जग भारत आणि चीनच्या मैत्रीकडे आशेने बघत आहे. भारतीय संस्कृतीत ‘वसुधैव कुटुंबकम’ची परंपरा आहे. त्यामुळे देश, भाषा भिन्न असल्या तरी आम्ही संपूर्ण जगाला आमचे कुटुंब मानत असल्याचे मोदी यांनी म्हटले. नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्याचा आज तिसरा आणि अखेरचा दिवस आहे.