मंगळावर पाणी आहे की नाही?’ याबाबत विपूल संशोधन करण्यात आले. मात्र त्याबाबतचे ठोस पुरावे अद्याप मिळालेले नाही. आता अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी मंगळावर फार पूर्वी हिमनद्या होत्या, असे संशोधन केले आहे. याबाबत खनिजशास्त्रीय पुरावेही आहेत, असा या शास्त्रज्ञांचा दावा आहे.
काही दशकांपूर्वी खगोलशास्त्रज्ञांनी सांगितले होते की, मंगळावर ग्रँड कॅनायन म्हणजे खोल दरीसारखा व्हॅलीस मरीनरीस नावाचा भाग असून त्याची लांबी ३२१८ कि.मी. आहे. उपग्रहांनी घेतलेल्या मंगळाच्या प्रतिमा पाहून संशोधकांनी असे स्पष्ट केले होते, की पूर्वी तिथे हिमनद्या वाहत होत्या व ते निष्कर्ष वादग्रस्त ठरले होते. पण आता अमेरिकेचे ब्रायन मावर महाविद्यालय आणि बर्लिनचे फ्राय विद्यापीठ यांनी संयुक्त संशोधन करून या भागातून हिमनद्या वाहत होत्या, याचे खनिजशास्त्रीय पुरावे सादर केले आहेत.
व्हॅलीस मरिनरीस या खोल दरीत ४.८ कि.मी. उंचीवर पश्चिमेकडे जे कडे आहेत, तेथे संमिश्र सल्फेट खनिजे सापडली आहेत. सेल्बी कल, पॅट्रिक मॅकग्वायर व ख्रिस्तोफ ग्रॉस व ब्रायन मावर यांच्या जेना मायर्स व निना शमोहून या विद्यार्थ्यांनी मंगळावरील जॅरोसाइट या सल्फेट खनिजाचा नकाशा तयार केला. हे खनिज खोल दरीच्या भिंतीवर दिसून आले.
‘जिओफिजिकल सोसायटी ऑफ अमेरिका’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
नार्वेतील आक्र्टिक महासागरातील नार्वेजियन बेट असलेल्या स्वालबार्डमधील हिमनद्यांप्रमाणेच प्रक्रिया तेथे घडून या रसायनाची निर्मिती झाली असावी असा अंदाज आहे. वातावरणातील सल्फर हा बर्फात पकडला जातो आणि सूर्यामुळे तो गरम होऊन पाण्याशी अभिक्रिया करून जॅरोसाइटसारखी आम्लधर्मी खनिजे तयार करतो.