अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले भाजपचे माजी नेते अरूण शौरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. जो नरेंद्र मोदींविरोधात उभा राहतो, त्यांच्यावर प्रदीप शर्मा (आयएएस) आणि तिस्ता सेटलवाड यांच्याप्रमाणे कायद्याचा ससेमिरा लावण्यात येतो, असा आरोप त्यांनी केला. मोदी खूप लवकर चिडतात, असेही ते म्हणाले. ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

मी मोदींवर कधीच टीका केली नाही – अरुण शौरी
केंद्र सरकारबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यामुळे राजस्थान पत्रिका या वृत्तपत्राला राजस्थान सरकारने जाहिराती दिल्या नसल्याचा आरोप त्यांनी केला. मोदी आणि अमित शहा हे दररोज राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मूल्यांना आपल्या पद्धतीने प्रोत्साहन देतात. मोठ्या संस्थांमध्ये कोणत्या लोकांची नियुक्ती करण्यात आली यावर एक नजर टाका असे सांगत त्यांनी इंडियन कौन्सिल फॉर हिस्टॉरिकल रिसर्चचे (आयसीएचआर) उदाहरण दिले.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अरूण शौरी यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कधीच टीका केली नसल्याचे म्हटले होते. नोटाबंदीच्या निर्णयावर माझ्या नावाने खपविण्यात येणारी सर्व विधाने धादांत खोटी आहेत. मी यासंदर्भात ट्विटरला नोटीसही पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. सोशल मीडियावरील या बनावट अकाऊंटमुळे मला मनस्ताप सहन करावा लागत आहे, असे शौरी यांनी म्हटले होते.