गुजरात राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसविरोधात बंडाचे निशाण फडकवणाऱ्या शंकरसिंह वाघेला यांनी मंगळवारी ‘जनविकल्प’ या तिसऱ्या राजकीय आघाडीची घोषणा केली. ही तिसरी आघाडी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या विरोधात असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. हा केवळ एक पक्ष नसून, यूपीए आणि एनडीए यांच्याप्रमाणे एकत्र आलेला समविचारी लोकांचा आणि पक्षांचा समूह असेल. या आघाडीला भाजपची बी टीम किंवा मॅचफिक्सिंग म्हणता येणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला कोणतीही संधी नाही. तर भाजपला प्रस्थापितविरोधी (अँटी-इन्कम्बन्सी) जनमताचा फटका बसण्याची शक्यता आहे.

गुजरातमध्ये जनतेसमोर कोणताही राजकीय पर्याय उपलब्ध नाही, हे म्हणणे चुकीचे ठरेल. मात्र, आपण स्वत: निवडणूक लढवणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जनविकल्प आघाडीचा प्रचार महिलांच्या समस्या, जीएसटी आणि बेरोजगारी यांसह २० प्रमुख मुद्द्यांवर केंद्रित असेल. ही आघाडी गुजरात विधानसभेच्या सर्व १८२ जागांवर निवडणूक लढवेल. आम आदमी पक्ष (आप), राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य पक्षांचे या आघाडीत स्वागत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे २१ सप्टेंबरपासून आम्ही प्रचाराला सुरूवात करू. त्यानंतर राज्यभर फिरून आम्ही लोकांना जनविकल्प आघाडीची माहिती सांगू. यावेळी मी त्यांच्याकडे जाऊन मतांची भीक मागणार नाही. मात्र, लोकांना आपल्या समस्यांवर उत्तर हवे असेल तर ते आमच्या आघाडीला मतदान करू शकतात, असे वाघेला यांनी सांगितले. गुजरातमधील काही तरूण आणि व्यावसायिक माझ्याकडे आले होते. त्यांनी सांगितल्यानंतर मी जनविकल्प आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीत ज्याप्रमाणे ‘आप’ने लोकांना तिसरा पर्याय उपलब्ध करून दिला आणि सत्ता मिळवली, तसेच गुजरातमध्ये घडू शकते, असा विश्वास वाघेला यांनी व्यक्त केला. गुजरात विधानसभेची निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे जनविकल्प आघाडी भाजप आणि काँग्रेससाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.