अर्थव्यवस्थेतील घसरणीवरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका करणारे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी गुरूवारीही आपला तोच सूर कायम ठेवला. देशाची अशी अवस्था होत असताना कोणताही व्यक्ती मौन बाळगू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले. अटलबिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात अर्थ खात्याचा कारभार पाहणाऱ्यांना सिन्हांनी देशातील जीडीपी सातत्याने घसरत आहे, सरकारही हे नाकारू शकत नसल्याचे म्हटले. नोटाबंदीच्या निर्णयानंतरही उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवण्यावर ते म्हणाले, जर कोणी निवडणूक जिंकतो तेव्हा त्याच्या साऱ्या चुका विसरता येणार नाही. निवडणुका जिंकणे एक गोष्ट आणि देश चालवणे वेगळी बाब आहे. पंतप्रधान म्हणतात की, पक्षाच्यावर देश आहे आणि मला वाटतं देशाबाबत मला बोलायचं असेल तर मी पक्षापेक्षा देशाला महत्व देईल, असेही त्यांनी म्हटले. ‘आज तक’ या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

जीएसटीबाबत बोलताना सिन्हा म्हणाले, जीएसटीला चालना देण्यासाठी मी महत्वाची भूमिका निभावली आहे. जेव्हा मी वित्त समितीचा अध्यक्ष होतो. तेव्हा प्रणव मुखर्जींनी हे विधेयक सादर केले होते. तेव्हा गुजरातचे अर्थमंत्री सौरभ पटेल यांनी याला विरोध केला होता. त्यानंतरही आम्ही आमच्या अहवालात जीएसटी लागू करण्याची शिफारस केली होती. मी सातत्याने जीएसटीचे समर्थन करत आलो आहे. माझे याबाबत मत बदलले नाही. जे लोक बदलले आहेत आणि आता सर्वांत मोठा बदल असल्याचे सांगत आहेत, त्यांनाच याबाबत विचारले पाहिजे.

मी अरूण जेटलींना हटवण्यासाठी सांगत नाही. पण ४० महिन्यांपासून ते अर्थमंत्री आहेत. त्यामुळे प्रश्न त्यांनाच विचारणार, असे ते म्हणाले. २०१४ मध्ये मी स्वत: निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत तुम्ही राजनाथ सिंह यांना विचारू शकता, असे त्यांनी म्हटले. मी २०१४ मध्येच राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. पण देशाचा जेव्हा मुद्दा येईल तेव्हा मी बोलणारच, असे त्यांनी ठामपणे सांगितले.