गेली १५ वर्षे गटारे स्वच्छ करण्याचे काम करणारा माजी राष्ट्रीय मुष्टियोद्धा कृष्णा रौत याने आता एखाद्या प्रतिष्ठेच्या कायम नोकरीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनाच साकडे घालण्याचे ठरवले आहे.
मुष्टियुद्धाचा माजी राष्ट्रीय विजेता असलेला कृष्णा याने सुरुवातीची ५ वर्षे हावडा महानगरपालिकेत भंगी (सफाई कामगार) म्हणून हंगामी नोकरी केली. २००५ साली त्याला गटारांमध्ये जंतुनाशके फवारण्याचे काम देण्यात आले. गेली दहा वर्षे मी हेच काम करतो आहे, असे कृष्णाने सांगितले. त्याने राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत १९८७ साली सुवर्णपदक, तर १९९२ साली रौप्यपदक जिंकले होते. याशिवाय प. बंगाल खुल्या लालचंद राय स्मृती मुष्टियुद्ध स्पर्धेत ४० किलो वजनी गटात १९८५ साली उपविजेतेपद, तर १९८७ साली विजेतेपद मिळवले होते. हंगामी कर्मचारी म्हणून रोज मिळणाऱ्या २३२ रुपयांमध्ये क्षयरोगाने ग्रस्त असलेल्या भावासह सहा जणांचे कुटुंब चालवणे अतिशय कठीण आहे. त्यामुळे प्रतिष्ठेचे जीवन जगता यावे यासाठी एखादी कायमस्वरूपी सरकारी नोकरी द्यावी, असे पत्र मी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लिहिणार आहे, असे कृष्णा याने सांगितले. ४३ वर्षांचा हा माजी बॉक्सर अजूनही दररोज कामावर जाण्यापूर्वी गरीब कुटुंबातील १५० मुलांना मुष्टियुद्धाचे प्रशिक्षण देतो.