१९९९ साली इंडियन एअरलाईन्सच्या आयसी- ८१४ विमान अपहरणाच्या घटनेत कथित गडबड झाल्याचा भाजपने इन्कार केला असून, कंदाहार अपहरणाबाबत काँग्रेसची ‘सोयीची स्मरणशक्ती’ असल्याचा टोला लगावला आहे.
डिसेंबर १९९९ मध्ये इंडियन एअरलाईन्सच्या आयसी- ८१४ विमानाचे अपहरण करून ते अफगाणिस्तानातील कंदाहार येथे नेण्यात आले आणि अपहृत प्रवाशांच्या सुटकेच्या मोबदल्यात मसूद अझर, ओमर शेख आणि मुश्ताक अहमद झरगर या तीन कट्टर अतिरेक्यांना सोडण्यात आले होते. अतिरेक्यांची सुटका करण्यास जम्मू- काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी जोरदार विरोध केला होता, परंतु तरीही तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह यांनी कंदाहारला जाऊन तीन अतिरेक्यांना सोडून दिल्याबद्दल त्यांच्यावर टीकेचा भडिमार झाला होता, असे गुप्तचर संस्था रिसर्च अँड अ‍ॅनॅलिसिस विंग (रॉ)चे तत्कालीन प्रमुख ए.एस. दुलत यांनी ‘काश्मीर : दि वाजपेयी इयर्स’ या हार्पर कॉलिन्सने नुकत्याच प्रकाशित केलेल्या पुस्तकात नमूद केले आहे. या मुद्यावर काँग्रेसने केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपने दुलत यांचा, तसेच सत्ताधारी पक्ष दहशतवादी आणि दहशतवाद यांच्याशी समझोता करत असल्याचा काँग्रेसचा दावा फेटाळून लावला. कंदाहारबाबत काँग्रेसची ‘सोयिस्कर स्मरणशक्ती’ असल्याचा टोला भाजपचे प्रवक्ते एम.जे. अकबर यांनी लगावला. प्रवाशांची सुटका करण्याच्या निर्णय सर्वाशी चर्चा करूनच घेण्यात आला होता, याची आठवण करून दिली.