रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (रॉ)चे माजी प्रमुख ए. एस. दौलत यांनी भारतीय सुरक्षा दलाच्या चकमकीत मारला गेलेला दहशतवादी बुऱ्हान वानी हा काश्मिरी युवकांचा आयकॉन होता, असे म्हणून नवीन वादाला तोंड फोडले आहे. द इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपले मत व्यक्त केले.
ते म्हणाले, बुऱ्हान वाणीला तुम्ही दहशतवादी म्हणू शकता पण येथील लोकांसाठी तो एक आयकॉन होता. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तो लोकप्रिय होता. त्यामुळेच तो जेव्हा मारला गेला तेव्हा मोठ्याप्रमाणात लोकांचा असंतोष बाहेर आला. त्याच्या मृत्यू नंतर काश्मीर खोरे ५० दिवसानंतरही धुमसत आहे (सोमवारी येथील संचारबंदी हटवण्यात आली).
काश्मीर खोऱ्यातील या परिस्थितीस भारत पाकिस्तानला जबाबदार धरत असताना दौलत मात्र या गोष्टीला महत्व देत नाहीत. लोकांच्या मनात अनेक वर्षांपासून राग धुमसत होता. भारताने या गोष्टीला महत्व दिले नाही. याला फक्त एका ठिणगीची गरज होती. ती कमतरता बुऱ्हान वानीने पूर्ण केली.
गुप्तचर आधिकारी या नात्याने मी अनेकांना दहशतवाद्याच्या दलदलीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अनेक दहशतवादी आज आपले नवे आयुष्य जगत आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या कालावधीत दौलत हे काश्मीर प्रकरणी सल्लागार होते.
हिजबूल मुजाहिदीनचा कमांडर असलेल्या बुऱ्हान वानीचा ८ जुलै रोजी सुरक्षा दलांबरेाबर झालेल्या चकमकीत मृत्यू झाला होता. या चकमकीत बुऱ्हानबरोबर सरताज अहमद आणि परवेज अहमद लष्करी हेही ठार झाले होते.