‘समान श्रेणी – समान निवृत्तीवेतन’ या मागणीसाठी गेल्या दीड महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या माजी सैनिकांनी आपला गुंतागुंतीचा प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रपतींना मध्यस्थी करण्याचे आवाहन केले आहे. उपोषणाला बसलेल्या आंदोलकांचे काही बरेवाईट झाल्यास तुम्ही आणि सरकारच जबाबदार असाल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. देशासाठी आपले जीवन बलिदान करण्यापूर्वी सैनिकाने शत्रूला संपवणे अपेक्षित असते, परंतु तुमच्या राज्यात सैनिकाचे जीवन पणाला लागले असून, त्याला त्याची रास्त देणी मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे, असे ‘युनायटेड फ्रंट ऑफ एक्स- सव्‍‌र्हिसमेन’ या संघटनेने सैन्यदलांचे सर्वोच्च कमांडर असलेल्या राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.