पाकिस्तानच्या गुजरनवाला शहरात लागलेल्या फलकांमुळे उरी हल्ल्यात लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे उघड झाले आहे. जम्मू-काश्मिरच्या उरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर १८ सप्टेंबर रोजी चार दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले होते. या चार दहशतवाद्यांपैकी एका दहशतवाद्याच्या मरणोत्तर अंत्यसंस्कार विधींचा फलक गुजरनवाला येथे लावण्यात आला आहे. उरी हल्ल्यात पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांचा सहभाग होता, या भारताच्या दाव्याला या फलकाने पुष्टी मिळाली आहे.
या फलकावर गुजरनवाला येथील रहिवासी मोहम्मद अनास उर्फ अबु सिरकाचे नाव आहे. फलकांद्वारे लोकांना त्याच्या अंत्यविधींना येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘उरी हल्ल्यासह ११७ भारतीय सैनिकांना नरकात पाठवणारा लष्कर-ए-तोयबाचा दैवी योद्धा’ अशा शब्दांत अबु सिरकाची प्रशंसा करण्यात आली आहे. याशिवाय, या फलकांवर जमात-उद-दवाचा प्रमुख हाफिज सईद याचेदेखील छायाचित्र आहे.
भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उरी हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मदचा हात असल्याचा संशय व्यक्त केला होता. मात्र, या हल्ल्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीने दहशतवाद्यांच्या त्यांच्या कमांडरसोबत बोलण्याच्या सांकेतिक पद्धतीवर या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचा सहभाग असल्याची शक्यता वर्तविली होती. दरम्यान, उरी हल्ल्यात ठार झालेल्या अन्य दहशतवाद्यांचेही अशाच प्रकारे मरणोत्तर अंत्यविधी करण्यात येत आहेत का, याबद्दल निश्चित माहिती मिळालेली नाही.

उरी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने आक्रमक भूमिका घेण्यात येत आहे. उरी हल्ल्याचा बदला म्हणून २९ सप्टेंबर रोजी भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून दहशतवाद्यांचे सात तळ उद्ध्वस्त केले होते. यामध्ये तब्बल ३७ दहशतवादी मारले गेले होते. दरम्यान, सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय तळांवर दहशतवादी हल्ले आणि पाककडून नियंत्रण रेषेवर सातत्याने शस्त्रसंधीच्या उल्लघंनाचे प्रकार घडत आहेत. पाकिस्तानकडून सीमाभागातील नागरी वस्ती आणि भारतीय चौक्यांना लक्ष्य करण्यात येत आहे.