काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांनी सध्या आपल्याला कशा प्रकारचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे आणि आपण त्यासाठी पात्र आहोत काय, अशी माहितीच्या अधिकारात विचारणा करणारे पत्र मेहसाणाच्या पोलिसांना पाठवले होते. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबाला कोणत्या प्रकारची सुरक्षा पुरविण्यात येते याचा घेतलेला आढावा.

* पंतप्रधानांना सुरक्षा कोण पुरवते?
सन १९८५पासून विशेष सुरक्षा दल (एसपीजी) पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहे. यामध्ये स्वत: पंतप्रधान, त्यांची पत्नी अथवा पती , मुले आणि त्यांच्या पालकांचा समावेश होतो. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या करण्यात आल्यानंतर एप्रिल १९८५मध्ये एसपीजीची स्थापन करण्यात आली. याशिवाय, ‘एसपीजी’कडून माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियांनादेखील सुरक्षा पुरविण्यात येते. त्यामुळेच सध्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना एसपीजी सुरक्षा लागू आहे. प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वडेरा यांना स्वत: प्रियांकासोबत असल्यासच ही सुरक्षा देण्यात येते.

* जशोदाबेन मोदी ‘एसपीजी’ सुरक्षेस पात्र आहेत का?
नाही. जशोदाबेन मोदी या एसपीजी सुरक्षेस पात्र नसून, त्यांना सध्या पुरविण्यात येणारी सुरक्षेची जबाबदारी गुजरात पोलिसांकडे आहे. एसपीजी कायद्यात पंतप्रधानांच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तींना पुरविण्यात येणाऱ्या विशिष्ट सुरक्षा तरतुदी या काहीशा वेगळ्या आहेत. या कायद्यातील ४(अ१) कलमानुसार आजी किंवा माजी पंतप्रधानांच्या कुटुंबातील व्यक्तींना ही सुरक्षा नाकारण्याचा पूर्ण अधिकार आहे.

* माजी पंतप्रधानांना किती काळापर्यंत एसपीजी सुरक्षा लागू असते?
सुरूवातीच्या काळात माजी पंतप्रधान राहिलेल्या व्यक्तीला दहा वर्षांपर्यंत एसपीजीकडून सुरक्षा देण्यात येत असे. मात्र, २००३ मध्ये रालोआ सरकार सत्तेत आल्यानंतर यामध्ये सुधारणा करून सुरक्षेचा कार्यकाळ एक वर्षावर आणण्यात आला. मात्र, एका वर्षानंतर संबंधित व्यक्तीला असणारा धोका लक्षात घेऊनच ही सुरक्षा हटविली जाते.

* एसपीजीची सुत्रे कोणाकडे असतात?
एसपीजीची सुत्रे महानिरीक्षक (आयजी) पदावरील अधिकाऱ्याकडे असतात. या पदावरील व्यक्तीचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो. एसपीजी केंद्रीय सचिवांच्या अधिकार कक्षेत येत असून सुरक्षा सचिव एसपीजीचे नेतृत्व करतात.