पाकिस्तानचे क्वेटा शहर आज बॉम्बस्फोटामुळे हादरले. बलुचिस्तान येथे हा स्फोट झाला. बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा येथे झालेल्या या बॉम्बस्फोटात किमान ५ जण ठार  तर १३ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. हा स्फोट पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयाजवळ झाला. हल्लेखोर जवळच असलेल्या लष्कराच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करत असणार, अशी माहिती सरकारी प्रवक्ता अन्वर अल-हक ककर यांनी दिली. हा स्फोट झाल्यानंतर लगेच आपत्कालीन पथक घटनास्थळी पोहोचले. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर रिकामा केला आहे. पाकमधील माध्यमांनी किमान ८ जण ठार झाली असण्याची शक्यता वर्तवली आहे.

जखमींना बलुचिस्तानच्या मेडिकल कॉम्प्लेक्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. या स्फोटामुळे पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयाजवळ असलेल्या वाहनांचेही मोठे नुकसान झाले. स्फोटानंतर बॉम्बनाशक पथक घटनास्थळी आले. स्थानिक पोलीस आणि इतर सुरक्षा दलाकडून तपास सुरू करण्यात आला आहे.