चौकशी सुरू; मात्र, अधिकाऱ्याकडून ठाम इन्कार

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांचे खासगी सचिव (पीएस) विनय श्रीवास्तव यांच्यासाठी रेल्वेने लखनौतून दिल्लीकडे जाणाऱ्या पद्मावती एक्स्प्रेसला खास वातानुकूलित डबा जोडल्याचा आरोप सोमवारी झाला. पंतप्रधान कार्यालयाच्या आदेशावरून या प्रकरणाची चौकशी चालू झाली असली तरी श्रीवास्तव यांनी या आरोपांचा साफ इन्कार केला.

‘ज्या व्यक्तीचे रेल्वे तिकीट निश्चित (कन्फर्म) होऊ  शकले नाही, त्यासाठी खास डबा जोडला गेल्याचा आरोप अतिशय हास्यास्पद आहे. मी खास डब्यासाठी कुणावर दबाव आणला नाही किंवा साधे कोणाशीही बोललोदेखील नाही. सणांमुळे गर्दी झाल्याने रेल्वेने स्वत:हून अतिरिक्त डबा लावला होता,’ असा खुलासा त्यांनी केला.

रेल्वे अभियांत्रिकी सेवेचे अधिकारी असलेले श्रीवास्तव आणि नोकरशहा असलेल्या त्यांच्या पत्नीला २१ ऑक्टोबर रोजी लखनौहून दिल्लीमध्ये यायचे होते. पण ‘लखनौ मेल’चे त्यांचे तिकीट अगदी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी असलेल्या कोटय़ातूनही (व्हीआयपी कोटा) निश्चित होऊ  न शकल्याने ते लखनौतील चारबाग स्थानकावर आले. त्यावेळी पद्मावती एक्स्प्रेसला जोडलेल्या दोन अतिरिक्त डब्यांमध्ये त्यांना जागा मिळाली. पण हे दोन डबे खास त्यांच्यासाठी जोडले गेले, त्यासाठी पद्मावती एक्स्प्रेसचा नेहमीचा प्लॅटफॉर्म ऐनवेळी बदलला गेला आणि या सगळ्या प्रRियेत एक तासांचा उशीर झाल्याचे वृत्त उत्तर प्रदेशातील माध्यमांनी प्रसिद्ध केले. त्या वृत्तानुसार, पंतप्रधान कार्यालयाकडे याबाबतच्या तक्रारी गेल्यानंतर रेल्वे मंडळाचे प्रमुख अश्विनी लोहानींनी चौकशीचे आदेश दिले. मात्र रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सणासुदीला गर्दी असल्यानेच डबे जोडले गेले. त्याच्याशी श्रीवास्तव यांचा काहीही संबंध नाही.

मृदू भाषी असलेले श्रीवास्तव हे जावडेकर वने व पर्यावरण मंत्री असल्यापासून खासगी सचिव आहेत. या प्रकरणाचा अनावश्यक बाऊ  केला जात असल्याचा दावा मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केला. स्वत: जावडेकरांकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. दरम्यान, आज (मंगळवार) आयोजित केलेली पत्रकार परिषद रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी रद्द केली. त्याचे कारण समजू शकले नाही.