फेसबुकवर  एका दिवसात १ अब्ज वापरकर्त्यांनी लॉग इन केल्याचा जागतिक विक्रम झाल्याचे सांगण्यात आले. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग यांनी फेसबुकवर म्हटले आहे, की आम्ही एक मैलाचा दगड पार केला आहे.  फेसबुकवर अंदाजे १.५ अब्ज वापरकर्ते महिनाभरात लॉग इन करतात  पण यावेळी एकाच दिवासत १ अब्ज लोकांनी लॉग इन केल्याचे स्पष्ट झाले आहे. फेसबुकची वापरकर्त्यांची संख्या ऑक्टोबर २०१२ मध्ये १ अब्ज झाली होती.
कॅलिफोर्नियातील फेसबुक या समाजमाध्यम कंपनीने  सोमवारी हा विक्रम केला असून पृथ्वीवरील सात पैकी एक जण त्याचे मित्र किंवा कुटुंबीयांच्या माध्यमातून फेसबुकशी जोडला गेला आहे. समाजातील प्रत्येक घटकाला आवाज मिळावा, त्याच्या म्हणण्याची दखल घेतली जावी याची संधी आधुनिक जगात फेसबुकने उपलब्ध करून दिली आहे. मुक्त तरीही एकमेकांशी संपर्क असलेल्या या जगात तुमच्या प्रियजनांशी नातेसंबंध दृढ करण्याचे काम फेसबुकने केले असून अर्थव्यवस्था सुधारत असल्याने आपली नवीन मूल्येही त्यात प्रतिबिंबित होत आहेत. हा मैलाचा दगड गाठण्यात वापरकर्त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. २००४ मध्ये झकरबर्ग यांनी त्यांच्या हार्वर्ड डॉर्म रूममध्ये फेसबुकची निर्मिती केली होती. समाजमाध्यमात फेसबुकचा जगात दुसरा क्रमांक आहे.