मुलीवरील उपचारानंतर बिल चुकवता न आल्याने संबंधित रुग्णालयाने तिला सोडण्यास नकार दिला. त्यामुळे तणावातून मुलीच्या वडिलांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना झारखंडमध्ये घडली आहे. तपन लेटे असे आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी बर्दवानमधील रुग्णालयाच्या व्यवस्थापकासह तीन मालकांनाही ताब्यात घेतले आहे.

तपन लेटे हा गरीब शेतकरी असून झारखंडमधील दुमका येथे राहत होता. एका खासगी रुग्णालयात त्याच्या मुलीला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिच्या उपचारासाठी आलेला खर्च जमा न केल्याने रुग्णालयाने तिला सोडण्यास नकार दिला. त्यामुळे तणावातून तपनने गावातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तपनच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ७ फेब्रुवारीला तपनच्या मुलीने बीरभूम येथील रुग्णालयात एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर तिची प्रकृती अधिकच खालावली. तेथील डॉक्टरांनी मुलीला संबंधित खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार तपनने मुलीला रुग्णालयात दाखल केले होते. बीरभूममधील रुग्णालयाने कोणत्याही तपासण्या न करता मुलीला या खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र, मुलीला कोणता त्रास होत आहे, याबाबत काहीही सांगितले नाही, असा आरोप तपनच्या कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाने आरोप फेटाळले आहेत. तपनची मुलगी न्यूसिया या आजाराने ग्रस्त होती, असे बीरभूम येथील डॉक्टरांनी सांगितले.

सरकारी रुग्णालयांत दाखल होणाऱ्या रुग्णांना चांगल्या सुविधा देण्याऐवजी त्यांना खासगी रुग्णालयांत दाखल करण्याचा सल्ला देण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. पोलिसांनी सांगितले की, तपनने मुलीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिसऱ्याच दिवशी रुग्णालयाने त्याच्या हातात तब्बल २५ हजार रुपयांचे बिल दिले. तपन गरीब असल्याने त्याने केवळ १३ हजार रुपयांचीच जमवाजमव केली. ते रुग्णालयात देण्यासाठी गेला. मात्र, रुग्णालयाने ते स्वीकारण्यास नकार दिला. तपन आणि त्यांच्या शेजारील व्यक्तीने रुग्णालयाच्या व्यवस्थापकाकडे विनवणी केली. आमच्याकडे इतकेच पैसे असून, उर्वरित पैसे भरण्यास असमर्थ असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, व्यवस्थापकांनी त्यांची काहीही ऐकून घेतले नाही. इतकेच नव्हे तर, जोपर्यंत बिल जमा करत नाहीत, तोपर्यंत मुलीला रुग्णालयातून सोडण्यात येणार नाही, असे व्यवस्थापकाने सांगितले. त्यामुळे नैराश्येतून तपनने आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.