कर्जमाफीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिणाऱ्या कर्नाटकमधील शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. कर्नाटकच्या बगलकोट जिल्ह्यात राहणाऱ्या इरप्पा यांनी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनाही कर्जमाफीसाठी पत्र लिहिले होते. मात्र सरकारी अनास्थेला कंटाळून इरप्पा यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.

बगलकोट जिल्ह्यातील मुधोला तालुक्यामधील नगानापुरा गावात राहणाऱ्या इरप्पा (वय ५७ वर्षे) यांनी रविवारी आत्महत्या केली. यानंतर पोलीस त्यांच्या घरी पोहोचले. त्यावेळी त्यांना त्यांच्या घरात काही कागदपत्रे सापडली. यावरुन त्यांनी याआधी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत पत्रव्यवहार केल्याचे समोर आले. आपल्या डोक्यावरील कर्ज माफ केले जावे यासाठी इरप्पा यांनी पंतप्रधान मोदी, सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश जे. एस. खेहर, मुख्यमंत्री सिद्धारामय्या आणि राज्याच्या प्रमुख सचिवांना पत्र लिहिले होते. इरप्पांनी २ मार्चला पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिले होते. यानंतर २० मार्चला पंतप्रधान कार्यालयाने त्यांच्या पत्राला उत्तर देत प्रमुख सचिवांना त्यांच्या समस्येकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्या होत्या.

पंतप्रधान कार्यालयासह मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात इरप्पांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचा उल्लेख केला होता. शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत देण्यापेक्षा, तो शेतकरी जीवंत असतानाच त्याला मदत करुन समस्या सोडवण्याचे आवाहन इरप्पा यांनी पत्रातून केले होते. ‘मी एक शेतकरी आहे. माझ्या डोक्यावर राष्ट्रीय बँकेचे ३ लाखांचे कर्ज आहे. यासोबतच जमीन खरेदीचे १० लाखांचे कर्ज आहे. आम्हाला बोअरवेलमधून पाणी मिळत नाही. त्यामुळे मला पाईपलाईनसाठी कर्ज घ्यावे लागले आहे. पाऊस कमी झाल्याने मी प्रचंड कर्जाखाली दबलो आहे. मी डिसेंबर २०१५ मध्ये मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. मात्र काहीच झालेले नाही. त्यामुळे आता आत्महत्या करण्याशिवाय माझ्याकडे कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही,’ असे इरप्पा यांनी पत्रात म्हटले आहे.