दिल्ली-आग्रा मार्गावर वेगवान गतीच्या रेल्वेची चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता या वर्षअखेरीपर्यंत आणखी आठ रेल्वे मार्गावर ताशी तब्बल १६० कि.मी. अंतर कापणाऱ्या अतिवेगवान गाडीची उणीव भरून काढणाऱ्या रेल्वेगाडय़ांची चाचणी केली जाणार आहे. या आठ मार्गामध्ये नागपूर-सिकंदराबाद आणि मुंबई-गोवा मार्गाचा समावेश आहे.
रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी सांगितले की, दिल्ली-आग्रा मार्गावर दहा डब्यांच्या गाडीची ताशी १६० कि.मी. वेगाची चाचणी जुलैत पार पडली. आता आणखी काही मार्गावर ही चाचणी होणार असून दिल्ली-आग्रा ही देशातील पहिली वेगवान गाडी या नोव्हेंबरमध्येच रूळावर येणार आहे.
चाचणी होणार असलेल्या आठ मार्गामध्ये नागपूर-सिकंदराबाद आणि मुंबई-गोवा यांच्यासह दिल्ली-कानपूर, दिल्ली-चंदीगढ, चेन्नई-हैदराबाद यांचाही समावेश आहे. या मार्गावर सिग्नल यंत्रणेचा दर्जा अद्ययावत केला जाणार आहे तसेच रूळांची क्षमता वाढविणे आणि मार्गाच्या दुतर्फा संरक्षक भिंत उभारण्याचे कामही हाती घेतले जाणार आहे. यामुळे अशा मार्गावरून शताब्दी एक्स्प्रेस गाडय़ाही चालवता येतील आणि अनेक लहान शहरेही जोडली जातील, असे गौडा यांनी सांगितले.
रेल्वे क्षेत्रात १०० टक्के थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी दिली गेल्याने अतिवेगवान प्रवासी वाहतूक तसेच मालवाहतुकीसाठी राखीव मार्गाची बांधणी शक्य होणार आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. थेट परकीय गुंतवणुकीला मान्यता असली तरी त्याबाबतचे उद्दिष्ट ठरविण्यात आलेले नाही. अर्थात या वर्षी सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रवाशांच्या सुरक्षिततेला आमचा अग्रक्रम असून त्यासाठी काकोडकर समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही गौडा म्हणाले.

भाजप मंत्र्यांच्या हाती झाडू!
रेल्वे परिसर स्वच्छ करण्यासाठी रेल्वेमंत्री सदानंद गौडा या दोन ऑक्टोबरला, महात्मा गांधी यांच्या जयंतीला हातात झाडू घेऊन रेल्वे स्थानकांमध्ये सफाई मोहिमेचा प्रारंभ करणार आहेत. रेल्वेचे १३ लाख कर्मचारी आणि उच्चपदस्थ अधिकारी इतकेच नव्हे तर रेल्वे बोर्डाचे अधिकारीही या मोहीमेत सहभागी होणार आहेत. ही अशा प्रकारची देशातली पहिलीच मोहीम आहे.