दिल्ली न्यायालयाने एका प्रकरणात ६३ वर्षांच्या वृद्धास  त्याने गर्भवती असलेल्या सुनेचा विनयभंग करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी १० वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली. जर एखादी स्त्री घरात सुरक्षित नसेल तर ती कुठेच सुरक्षित असू शकत नाही असे न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायालयाने सांगितले की, आपल्या मनात लैंगिक छळवणुकीची मानसिकता खोलवर रूजलेली आहे. कुटुंबातील अनेक लोक असे गुन्हे करून ते लपवित असतात, अशा प्रकारचे संबंध हे संमतीचे नसतात.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश कामिनी लउ यांनी सांगितले की, आपण सुलतानपुरी येथील भारत सिंग रावत यांना दहा वर्षे तुरूंगवासाची शिक्षा देत आहोत. त्यांनी त्यांच्या सुनेचा लैंगिक छळ केल्याने त्यांच्या २४ वर्षांच्या सुनेने ३ सप्टेंबर २००८ मध्ये आत्महत्या केली होती.
आपल्या समाजरचनेत काहीतरी गडबड आहे, जर एखादी महिला तिच्या घरात सुरक्षित नसेल तर कुठेच सुरक्षित नसेल. रात्रपाळीला गेलेल्या पतीच्या अनुपस्थितीत सुनेला जपण्याच्या ऐवजी त्या परिस्थितीचा असा फायदा घेऊन लैंगिक कृत्ये करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर ते दुर्दैवी आहे. रक्ताच्या नात्यात व कुटुंबात जर अशा घटना स्त्रियांच्या बाबतीत घडत असतील तर त्याकडे दुर्लत्र करता येणार नाही. कुटुंबातील कुटुंबात होणारा लैंगिक छळ ही गंभीर समस्या आहे, अनेक कुटुंबात हे गुन्हे लपवले जातात. या प्रकरणात रावत यांनी सुनेला आत्महत्येस भाग पाडले व शिवाय तिच्या पोटातील बाळाचाही जीव घेतला. तिच्या शवविच्छेदनापूर्वी तिच्या मृतदेहाजवळ चिठ्ठी सापडली होती.