सौदी एअरलाईन्सकडून प्रवाशांसाठी नुकताच नवा ड्रेसकोड जाहीर करण्यात आला. या ड्रेसकोडनुसार आता पुरूष व महिला प्रवाशांना त्यांचे संपूर्ण अंग झाकणारे कपडे घालावे लागणार आहेत. अन्यथा त्यांना विमानात चढून दिले जाणार नाही, असे सौदी एअरलाईन्सकडून स्पष्ट करण्यात आले. सौदी एअलाईन्स ही सौदी अरेबियातील राष्ट्रीय हवाई वाहतूक कंपनी आहे. त्यामुळे आता या फतव्यामुळे पश्चिम आशियाई देशांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता त्यांच्याबरोबर संपूर्ण अंग झाकतील, असे कपडे बाळगावे लागणार आहेत.

सौदी एअरलाईन्सच्या संकेतस्थळावर प्रवाशांच्या या ड्रेसकोडची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. विमानातील इतर प्रवाशांना आक्षेप असेल असे कपडे कोणत्याही प्रवाशांनी घालू नयेत, असे संकेतस्थळावर म्हटले आहे. याशिवाय, पाय आणि हात दिसतील किंवा पारदर्शी आणि गरजेपेक्षा जास्त घट्ट असलेले कपडे घातलेल्या महिलांना विमानात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच शॉर्टस घालून अंगप्रदर्शन करणाऱ्या पुरूषांनाही विमानात बसू दिले जाणार नाही, असा सूचना सौदी एअरलाईन्सकडून देण्यात आल्या आहेत. या फतव्यानंतर सोशल मीडियावरून सौदी एअरलाईन्सवर मोठ्याप्रमाणावर टीका सुरू आहे. तर काही जणांनी या निर्णयाला पाठिंबाही दिला आहे. मात्र, अशाप्रकारे निर्बंध लादून सौदी एअलाईन्स पर्यटनाला कशाप्रकारे चालना देणार, असा सवाल एका इंटरनेट युजरने विचारला आहे. मात्र, सौदीचे पर्यटन मंत्री अल घामडी यांनी हा निर्णय केवळ सौदी एअरलाईन्सपुरता नव्हे तर आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने (आयएटीए) जारी केलेला आहे. मात्र, सर्व हवाई कंपन्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने या निर्णयाची अंमलबजावणी केल्याचे अल घामडी यांनी म्हटले.