‘ही एक लढाई आहे. धार्मिक असहिष्णुता सर्वत्र आहे. त्याविरूध्द निकराची झुंज देताना आपण कमजोर असल्याचं समजू नका, हताश होऊ नका’

नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचा संयत आवाज लंडन स्कूल आॅफ इकाॅनाॅमिक्समध्ये घुमत होता. अर्थशास्त्राच्या शिक्षणासाठी जगभर मोठं नाव असलेल्या लंडन स्कूल आॅफ इकाॅनाॅमिक्समधल्या ‘अमर्त्य सेन लेक्चर सीरिज’ या त्यांचंच नाव दिलेल्या व्याख्यानमालेचं उद्घाटनाचं भाषण त्यांनी केलं.यावेळी या व्याख्यानमालेत ‘धार्मिक असहिष्णुतेचा लोकशाहीवर होणारा परिणाम’ यावर चर्चा सुरू होती.

धार्मिक असहिष्णुतेविरूध्दची लढाई मोठी असल्याचं सांगत असहिष्णुतेविरूध्द लढत असताना कोणीही कमजोर नसतो असे धीराचे शब्द डाॅ.सेन यांनी उपस्थितांना सांगितले. या लढाईत प्रत्येकजण आपापल्या पातळीवर योगदान देऊ शकतो असं सेन म्हणाले.

गेल्या काही वर्षात भारतात तसंच जगात सगळीकडेच उजव्या विचारसरणीचं प्राबल्य वाढलं आहे. भारतातल्या स्थितीविषयी अनेकदा डाॅ.सेन यांनी याआधी नाराजी व्यक्त केली आहे. त्याबद्दल त्यांच्यावर अनेकदा टीकाही झाली. पण त्यानंतरही त्यांनी निर्भीडपणे आपली मतं मांडणं सुरू ठेवलं.

या व्याख्यानमालेतलं आजचं सत्र पाकिस्तानमधल्या मानवी हक्क क्षेत्रातल्या कार्यकर्त्या अस्मा जहाँगीर यांनी सादर केलं.

भारतामध्ये मानवी हक्कांना कायदेशीर रूप प्राप्त झाल्याने भारतातली यासंबंधीची स्थिती काहीशी चांगली आहे. पण पाकिस्तानमध्ये तेही नसल्याने अस्मा सारख्यांना प्रचंड मोठा लढा द्यावा लागतो असं डाॅ.सेन म्हणाले. त्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीत असलो तरी आपल्या लढ्याला कधीच यश येणार नाही असे निराशेचे विचार कधीच मनात आणू नका असं आवाहन डाॅ. सेन यांनी केलं.

अस्मा जहांगीर यांनीही लोकशाही मूल्यांचा प्रसार करताना न घाबरता काम करायचं आवाहन लंडन स्कूल आॅफ इकाॅनाॅमिक्सच्या विद्यार्थ्यांना केलं.

सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन आॅफ पाकिस्तानच्या अध्यक्षपदी बसणाऱ्या अस्मा जहांगीर या पहिल्या महिला आहेत.

असहिष्णुतेचा प्रश्न जगभर सगळीकडेच असल्याचं जहांगीर म्हणाल्या.अशा समस्यांचा सामना करण्यासाठी देश प्रदेशाच्या सीमा विसरत या प्रश्नांविषयी कळकळ असणाऱ्या जगभरातल्या नागरिकांनी एकत्र येण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली.

पाकिस्तानमध्ये कायदे असले तरी त्यांच्यावर ‘शरिया’ सारख्या इस्लामी कायद्यांचा प्रभाव आहे. शरिया मधल्या अनेक बाबी कित्येक शतकांपूर्वीच्या असल्याने त्या आजच्या काळाशी सुसंगत नाहीत. तरीही या तरतुदींचा आधार घेत आजही न्यायनिवाडा केला जातो. त्यामुळे स्त्रियांच्या तसंच धार्मिक, पंथीय अल्पसंख्याकांच्या साध्या साध्या हक्कांवर मोठी गदा येते.

[jwplayer x8Hz9m8G]

लंडन स्कूल आॅफ इकाॅनाॅमिक्समध्ये यावेळी धर्माच्या दुरूपयोगाविषयी चर्चा झाली. प्राचीन काळापासून अनेकांनी धर्मव्यवस्थेचा फायदा घेत आपल्या विरोधकांना संपवलं. याच विचारसरणीतून अनेक हिंदू, मुस्लिम, ज्यू अशा अनेक समाजांच्या कत्तली केल्या गेल्याचं अस्मा जहांगीर म्हणाल्या. या पार्श्वभूमीवर भारतातल्या कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीबाबत विचारलं असता त्या काहीशा विनोदाने म्हणाल्या ”दक्षिण आशियात आपलं स्वागत आहे”