पॅसिफिक राष्ट्रांना कर्जाच्या माध्यमातून आर्थिक मदत आणि एकूण १४ राष्ट्रांमधील नागरिकांना भारतात आल्यानंतर व्हिसा आणि फिजीला विकासकामांसाठी ८० दशलक्ष डॉलरची मदत देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केलेल्या घोषणेने भारताचा या देशांवरील प्रभाव आणखी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी अवकाश मोहिमांमध्ये फिजी हा मुख्य केंद्र म्हणून भारताला साहाय्य करेल, असेही मोदी यांनी या वेळी स्पष्ट केले.
मोदी बुधवारी फिजीच्या दौऱ्यावर आले आहेत. फिजीचे पंतप्रधान फ्रँक बैनिमिरामा यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी पॅसिफिक राष्ट्रांना १० लाख डॉलर विशेष दत्तक निधीची घोषणा केली. याच वेळी ‘टेलि-मेडिसीन’, ‘टेलि-एज्युकेशन’साठी ‘पॅन पॅसिफिक’ प्रकल्प विकसित करण्याचा प्रस्तावही त्यांनी या वेळी मांडला.
३३ वर्षांनंतर फिजीला भेट देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. १९८१ साली माजी पंतप्रधान, दिवंगत इंदिरा गांधी या फिजी दौऱ्यावर गेल्या होत्या. मोदींच्या फिजीच्या एक दिवसाच्या दौऱ्यात भारत आणि फिजी यांच्यातील सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य करार वाढवण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. प्रशांत महासागर प्रदेशातील मुख्य केंद्र म्हणून फिजीचा उदय व्हायला हवा, या उद्देशाने दोन्ही नेत्यांनी विविध विकास करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. या वेळी ‘वुला मोदी’ (मोदींचे स्वागत असो) अशा आशयाचे फलक राजधानी शहरातील रस्त्यांवर जागोजागी लावण्यात आले होते. या वेळी १२ पॅसिफिक देशांच्या नेत्यांसमोर मोदींचे भाषण झाले. विकास आणि युवाशक्तीचा वापर या दृष्टीने त्यांचे व्याख्यान महत्त्वाचे मानले जात आहे.