बलात्कार प्रकरणातील आरोपी बॉलिवूड चित्रपट निर्माता करीम मोरानी शनिवारी तेलंगणा पोलिसांना शरण आला. दामिनी, राजा हिंदुस्तानी, रा-वन, चेन्नई एक्स्प्रेस या चित्रपटांची मोरानीने निर्मिती केली आहे. दिल्लीत राहणाऱ्या एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

मोरानीने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप बिझनेस मॅनेजमेंटची विद्यार्थिनी असलेल्या २५ वर्षांच्या पीडितेने या वर्षी जानेवारीत केला होता. त्यानंतर पोलिसांनी मोरानीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तसेच वैद्यकीय तपासणीसाठीही घेऊन जाणार आहेत. पीडितेला चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. तिच्या तक्रारीनुसार, मोरानीने मुंबई आणि हैदराबादमध्ये नेले आणि तेथे आपल्यावर अनेकदा बलात्कार केला. तसेच त्याने लग्नाच्या भूलथापाही दिल्या होत्या. करीमवर फसवणूक, बलात्कार, धमकावणे आणि इतर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.

या महिलेने एका मुलाखतीत मोरानीवर गंभीर आरोप केले होते. मोरानीने जुलै २०१५ मध्ये बलात्कार केला. त्यावर कशी व्यक्त होऊ हेच मला समजत नव्हते. खूप तणावात होते. याबद्दल मी कुणालाही काही सांगितले नाही. याबाबत मी मोरानीच्या कुटुंबीयांशी बोललो, पण तेही काही बोलले नाहीत. त्यानंतर याविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला, असे तिने सांगितले होते. दरम्यान, मोरानी २ जी घोटाळा प्रकरणातही आरोपी आहे.