बुलेट ट्रेनला हिंदीमध्ये काय म्हणतात ? केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचे भाषण सुरू असतानाच एकाने अचानक हा प्रश्न विचारला. या प्रश्नामुळे भडकलेल्या जेटलींनी प्रश्न विचारणाऱ्याला लगेच फैलावर घेतले आणि जरा गंभीर होण्याचा सल्ला दिला. परंतु, जेटलींच्या या पवित्र्यामुळे माध्यमांमध्ये मात्र मोठी चर्चा रंगली आहे.

जेटली हे एका परिषदेत बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत बोलत होते. यावेळी त्यांनी माध्यमांवर टिप्पणी करत कमी माहिती असलेले लोक याविषयावर नाहक वाद घालत असल्याचे म्हटले. त्याचवेळी समोर बसलेल्या एका व्यक्तीने अचानक, ‘अरूणजी बुलेट ट्रेनला हिंदीमध्ये काय म्हणतात ? हिंदीमध्ये सांगा इंग्रजीमध्ये नका,’ असा सवाल केला. अचानक आलेल्या या प्रश्नामुळे जेटली थोडेसे अस्वस्थ झाले. त्यांनी लगेच प्रश्न विचारणाऱ्याला फटकारले. कृपया, गंभीर व्हा. तुम्हाला एकदा पाहिलेलं आहे. गंभीर होण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला देत पुन्हा आपले भाषण त्यांनी पुढे सुरू ठेवले. जेटली हे बोलत असताना प्रश्न विचारणाऱ्याने मी विचारलेला प्रश्न हा गंभीरच आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी अहमदाबादमध्ये देशातील पहिली बुलेट ट्रेनचे भूमीपूजन केले. त्यानंतर देशात बुलेट ट्रेनवरून सोशल मीडिया व माध्यमांमध्ये मोठ्या चर्चा रंगल्याचे दिसून येते.