भारतीय नागरिकांनी विदेशातल्या बँकांमध्ये किती काळा पैसा साठवून ठेवला आहे याबद्दल सरकारकडे नेमकी आकडेवारी नाही असं केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी म्हटलं आहे. लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही भूमिका मांडली आहे. आर्थिक प्रकरणांमध्ये स्थायी समिती अनेक शिफारसींच्या आधारावर देशात आणि देशाबाहेर किती काळा पैसा गुंतवण्यात आला आहे याची माहिती घेणं सुरू आहे. मात्र देशाबाहेर नेमका किती पैसा आहे हे सांगता येणार नाही असं अरूण जेटली यांनी म्हटलं आहे.

विदेशात नेमका किती काळा पैसा असू शकतो याचा अंदाज लावण्यासाठी एनआयपीएफपी आणि एनसीएईआर या संस्था आढावा घेत आहेत. एनआयएफएम तर्फेही हा काळा पैसा नेमका किती आहे? हे शोधण्यासाठी प्रयत्न करण्यात येतो आहे. या तिन्ही संस्थांचा अहवाल काय आहे तो लवकरच स्थायी समितीसमोर ठेवण्यात येईल असंही जेटली यांनी स्पष्ट केलं आहे. स्वित्झर्लंडमधल्या एचएसबीसी बँकेत ६२८ भारतीयांची बँक खाती असल्याची माहिती आम्हाला फ्रान्स सरकारकडून मिळाली आहे. या प्रकरणातले ८ हजार ४३७ कोटी रूपये मे २०१७ मध्ये कराच्या कक्षेत आणले गेले आहेत अशीही माहिती जेटली यांनी दिली आहे.

काळा पैसा साठवण्यावर निर्बंध लादण्यासाठी भारतानं अनेक देशांसोबत करार केले आहेत. मागील महिन्यात स्वित्झर्लंडनं भारत आणि इतर ४० देशांसोबत काळा पैसा असल्याचा संशय असलेली खाती आणि त्याची माहिती कळविण्याला मंजुरी दिली होती. सध्या जरी नेमके किती पैसे देशाबाहेर गुंतवले गेले आहेत हे सांगण्यात आलेलं नसलं तरीही लवकरच त्याची माहिती आम्ही घेऊ असंही जेटली यांनी स्पष्ट केलं आहे.