बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या जाहीर सभा घेण्यावर निवडणूक आयोगाने बंदी घातल्यानंतर शनिवारी गाझियाबादमध्ये त्यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आली. निवडणूक आयोगाने त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याची दखल घेत आझम खान यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. यापूर्वी शुक्रवारी अमित शहा आणि आझम खान या दोघांवर गुन्हा नोंदविण्याचेही आदेश आयोगाने दिले होते. तसेच या वक्तव्यांप्रकरणी दोन्ही नेत्यांना स्पष्टीकरण देण्याचे आदेशसुद्धा निवडणूक आयोगाने दिले आहेत. 

उत्तर प्रदेशातील भाजपच्या प्रचाराची जबाबदारी असलेल्या अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी मुझफ्फरनगर दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर “बदला’ घेण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. ही निवडणूक दंगलीचा बदला घेण्यासाठी आहे, असे ते म्हणाले होते. तर दुसरीकडे माजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी निवडणुकीच्या प्रचारात कारगिल युद्धाचा मुद्दा उपस्थित केला होता. या युद्धात विजय मिळविणारे जवान हिंदू नव्हते, तर हा विजय मुस्लिम जवानांमुळे मिळाल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानांवरून दोन्ही नेत्यांवर बरीच टीका झाली होती.