बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचा (राजद) वादग्रस्त नेता मोहम्मद शहाबुद्दीन याच्यावर सिवान कारागृहात सेल्फी काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद शहाबुद्दीनचा हा सेल्फी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. याप्रकरणात मोहम्मद शहाबुद्दीन आणि आणखी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुफासिल पोलीस ठाण्याचे प्रमुख विनय प्रताप सिंग यांनी दिली. मुफासिल पोलीस ठाण्यात १४ जानेवारीलाच ही तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, प्रसारमाध्यमांना त्याची माहिती काल मिळाली. सिवान कारागृहाचे अधीक्षक बिधू भारद्वाज यांनी ही तक्रार दाखल केली आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शहाबुद्दीनने त्याचा टक्कल केलेला आणि ओव्हरकोट घातलेला नव्या अवतारातील सेल्फी काढला होता. हा सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता.
सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर महिन्यात मोहम्मद शहाबुद्दीन याचा जामीन रद्द करत त्याची रवानगी पुन्हा तुरूंगात केली होती. तसेच न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयास राजीव रोशन हत्या प्रकरणाची सुनावणी जलदगतीने करण्यास सांगितले होते. राजीव रोशन खूनप्रकरणी शहाबुद्दीन यांना पाटणा उच्च न्यायालयाने जामीन दिला होता. हा जामीन रद्द करावा यासाठी राजीव रोशन यांचे वडील चंद्रकेश्वर प्रसाद (चंदा बाबू) यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. दरम्यान शहाबुद्दीन याने कोर्टासमोर समर्पण केले आहे. शहाबुद्दीन याच्यावर ४० पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. एका खून प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने शहाबुद्दीनला जन्मठेप सुनावली होती.


सिवान येथील चंदाबाबू यांचे तीन मुले राजीव, गिरीश आणि सतीश यांचा खून करण्यात आला आहे. त्यांचा मोठा मुलगा राजीव याने आपल्या दोन्ही भावांच्या खून प्रकरणात मुख्य साक्षीदार म्हणून जवाब दिला होता. त्यानंतर राजीव यांचाही खून करण्यात आला होता. राजीव खून प्रकरणात शहाबुद्दीनही आरोपी आहे. शहाबुद्दीन २००५ पासून तुरूंगात आहे. या खटल्याच्या सुनावणीस कनिष्ठ न्यायालयात विलंब होत असल्यामुळे उच्च न्यायालयाने शहाबुद्दीन याला जामीन दिला होता. यापूर्वी न्यायालयाने नितीशकुमार सरकारवर ताशेरे ओढले होते. राजीव रोशनच्या हत्येला १७ महिने होऊनही शहाबुद्दीनवर आरोपपत्र दाखल का करण्यात आला नाही, असा जाब न्यायालयाने सरकारला विचारला होता.