नॅचरल हिस्टरी संग्रहालयातील प्राण्यांचे नमुने जळून खाक

मध्य दिल्लीतील फिक्कीच्या इमारतीत लागलेल्या आगीत नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी हे संग्रहालय जळून खाक झाले. मंगळवारी पहाटेच्या वेळी ही घटना घडली. प्राण्यांचे भुसा भरून जतन केलेले नमुने यांच्यासह जीवशास्त्राच्या अभ्यासासाठी मौल्यवान असलेल्या अनेक गोष्टी यात जळून गेल्या.

या संग्रहालयाची स्थापना १९७२ साली झाली होती आणि देशातील अशा प्रकारच्या दोन महत्त्वाच्या संग्रहालयांपैकी ते होते. इमारतीत दुरुस्तीचे काम सुरू होते. पहाटे पहाटे १.४५ वाजता लागलेली आग लवकरच सगळीकडे पसरली. अग्निशमन दलाचे पस्तीस बंब घटनास्थळी पाठवण्यात आले होते. आग विझवण्यास चार तास लागले. नंतर शीतकरण मोहीम राबवण्यात आली. ती काही तास चालू होती. भुसा व रसायने भरलेले प्राणी व इतर नमुने यात जळून गेले. आगीचे कारण समजू शकलेले नाही. आग लागली तेव्हा तिथे फारसे लोक नव्हते त्यामुळे इमारत रिकामी करणे फारसे कठीण गेले नाही.

अग्निशमन दलाच्या सहा अधिकाऱ्यांना जास्त धूर छातीत गेल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. काही अधिकाऱ्यांची प्रकृती आता स्थिर आहे. दोन जणांना राममनोहर लोहिया रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी घटनास्थळी भेट दिली असून ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. आपल्या मंत्रालयाच्या अखत्यारीतील सर्व संग्रहालयांची सुरक्षा तपासणी करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. ते म्हणाले की, संग्रहालयाला लागलेली आग ही दुर्दैवी होती. म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी हे राष्ट्रीय वारसा ठिकाण होते. तेथे लोक दरदिवशी भेट देत असत. अधिकारी आगीने झालेल्या नुकसानीचा अंदाज घेत आहेत.