23 October 2017

News Flash

विमानाप्रमाणे अत्याधुनिक सुविधा असलेली ‘तेजस’ रेल्वे २२ मेपासून ट्रॅकवर

प्रत्येक आसनामागे एलसीडी, स्मार्ट स्वच्छतागृह, वायफाय

नवी दिल्ली | Updated: May 20, 2017 9:48 AM

संग्रहित छायाचित्र

मोठ्या प्रतिक्षेनंतर आता भारतीय रेल्वेची नवीन ट्रेन तेजस धावण्यासाठी तयार झाली आहे. या रेल्वेचा प्रवास २२ मे रोजी सुरू होणार आहे. पहिली रेल्वे मुंबई आणि गोवा या मार्गावरून धावणार आहे. अनेक नवी वैशिष्ट्ये आणि सुविधायुक्त असलेल्या या रेल्वेचे तिकीट दरही राजधानी आणि शताब्दीपेक्षा जास्त आहेत. विमानातील सोयीसुविधा या रेल्वेत पुरवण्यात आल्या आहेत. प्रत्येक आसनामागे एलसीडी स्क्रीन, स्मार्ट स्वच्छतागृह, वायफाय आदी सुविधा या रेल्वेत प्रवाशांना मिळणार आहेत.

अत्याधुनिक सुविधांनीयुक्त असलेल्या या रेल्वेची पाहणी शुक्रवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली. या रेल्वेत अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात येणार असल्यामुळे याचे तिकीट दर जास्त असल्याचे ते म्हणाले. तिकीट दराबाबत मात्र त्यांनी जास्त माहिती दिली नाही. तर रेल्वे अधिकाऱ्यांनी या रेल्वेच्या तिकीट दराबाबत अभ्यास केला जात असून लवकरच त्याची घोषणा केली जाईल, असे सांगितले.

नावाप्रमाणेच ही रेल्वे सुमारे २०० किमी इतक्या वेगाने धावू शकते. परंतु, भारतीय रेल्वे रूळ इतका वेग सहन करू शकत नसल्यामुळे ती कमाल १३० किमी इतक्या वेगाने धावू शकेल. रेल्वे रूळांत योग्य बदल केल्यास २०० किमी वेगाने रेल्वे धावू शकते.

tejas-7591

भारतातील ही पहिलीच अशी रेल्वे आहे की, जिचे दरवाजे मेट्रो सारखे स्लायडिंग पद्धतीचे असतील. याचे नियंत्रण गार्डकडे असेल. त्यामुळे प्रवाशांसाठी ही अत्यंत सुरक्षित पद्धत ठरेल. यामुळे रेल्वे सुरू झाल्यानंतर प्रवाशाला चढता येणार नाही व रेल्वे थांबल्याशिवाय उतरता येणार नाही. अशा प्रकारच्या दरवाजांमुळे रेल्वेतून चढताना व उतरताना होणाऱ्या अपघातावर नियंत्रण मिळवता येऊ शकेल.

एलसीडी आणि वायफाय
या रेल्वेचे खास वैशिष्ट्य म्हणजे विमानांप्रमाणे रेल्वेतील प्रत्येक आसनामागे एलसीडी स्क्रीन लावण्यात आलेली आहे. यावर प्रवाशांना मनोरजंनाचे कार्यक्रम पाहता येतील. रेल्वेत वायफाय सुविधाही असेल. इतकंच नव्हे तर विमानात गरजेवेळी बटन दाबताच जशा एअर होस्टेस येतात. त्याचपद्धतीने रेल्वेत अटेंडेंटला बोलावण्यासाठी कॉल बेलची सुविधा देण्यात आली आहे.

tejas-2-759

रेल्वेच्या स्वच्छतागृहात टचलेस नळ आणि बायो व्हॅक्यूम यंत्रणा आहे. रेल्वेत सीसीटीव्ही कॅमेरांबरोबर पॅसेंजर इन्फर्मेशन सिस्टिम लावण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशाला पुढील स्थानक कोणते आहे, याची माहिती समजेल. रेल्वेत एलईडी लायटिंगबरोबर डेस्टिनेशन बोर्डही लावण्यात आले आहेत.

First Published on May 20, 2017 9:41 am

Web Title: first developed rail coach tejas train to run on may 22