भारतात हत्येचा आरोप असलेल्या इटालीच्या दोन खलाशांपैकी एका खलाशाला वैद्यकीय उपचार घेण्यासाठी चार महिन्यांसाठी मायदेशी जाण्याची मुभा सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. वैद्यकीय उपचार घेण्यासाठी मायदेशी जाण्याबाबत खलाशाने केलेली विनंतीला तत्त्वत: कोणतीही हरकत नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केल्यानंतर न्यायालयाने ही मुभा दिली आहे.
इटालीचा खलाशी मस्सिमिलिआनो लॅटोर याने इटालीत जाण्याची आणि उपचार घेऊन भारतात परतण्याचा स्पष्ट  आणि थेट तपशील दिल्यानंतरच मायदेशी जाण्याची परवानगी देणारा आदेश अमलात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने लॅटोर याला विशिष्ट उल्लेखांसह नव्याने हमीपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी सादर करण्यात आलेल्या हमीपत्रात खटल्याच्या अखत्यारीबाबतचा प्रश्न नमूद केला होता.