भारताविरोधात सतत गरळ ओकणारे पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी पुन्हा एकदा भारतावर टीका केली आहे. सार्क परिषदेमध्ये सहभागी न होण्याचा भारताचा निर्णय दुर्दैवी असल्याचे सांगतानाच त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघात प्रभावी भाषण करणाऱ्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना ‘कॉस्मेटिक’ असे विशेषण वापरत हिणवले आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर काश्मीरमधील उरी येथे झालेला दहशतवादी हल्ला विनाकारण राजकीय पातळीवर नेऊन ताणण्यात येत आहे, असेही धक्कादायक विधान त्यांनी केले आहे. ‘इंडिया टुडे’ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भारतावर टीका केली. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही शेजारी देशांमधील संबंध सध्या तणावपूर्ण आहेत. या पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांवर त्यांनी कोणकोणती मते मांडली हे जाणून घेऊया.
१. उरी हल्ला – उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तान अजिबात जबाबदार नाही. पाकिस्तानला नाहक यामध्ये गोवले जात आहे. भारतात कोणताही हल्ला झाल्यानंतर १२ तासांच्या आतच त्याबद्दल पाकिस्तानला जबाबदार धरण्यात येते. फक्त पाकिस्तानच नाही तर तेथील सरकार आणि लष्कराकडेही बोट दाखवण्यात येते.
२. सिंधू पाणी करार – यासंदर्भात भारताकडून करण्यात येणाऱ्या प्रत्येक खेळीला उत्तर देण्याची ताकद पाकिस्तानमध्ये आहे. पाकिस्तान त्यासाठी पूर्णपणे तयार आहे.
३. बलुचिस्तान – बलुचिस्तानच्या प्रश्नामध्ये भारत का हस्तक्षेप करतो आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. बलुचिस्तानमध्ये राहणारे ५० टक्के नागरिक हे पाकिस्तानचे समर्थन करतात, याकडेही त्यांनी या मुलाखतीमध्ये लक्ष वेधले. बलुचिस्तानमध्ये भारतीय गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी तेथील बंडखोरांना फूस लावत आहेत, असाही आरोप त्यांनी केला.
४. शांतता प्रक्रियेबद्दल – आम्हालाही भारतासोबत शांतताच प्रस्थापित करायची आहे. आम्हाला कोणतेही युद्ध नकोय. पण त्याआधी काश्मीरबद्दलची भूमिका स्पष्ट करून एक ठराव दोन्ही देशांनी केला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
५. बुरहान वाणी – या मुलाखतीमध्येही परवेझ मुशर्रफ यांनी बुरहान वाणी हा थोर स्वातंत्र्यसैनिक होता, असे मत मांडले आहे. काश्मीरमध्ये धुमसत्या वातावरणामुळे ८० नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, याकडे भारत सरकारने लक्ष दिले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.