पोपपदाचा इतिहास दोन हजार वर्षांचा आहे. या दोन हजार वर्षांत फक्त पाच पोपनी पदावर असताना राजीनामा दिल्याचे इतिहास सांगतो. अनेक पोपची हकालपट्टी झाली. २१ पोप शहीद झाले तर नऊ पोप शहीद झाल्याचे मानले जाते. चार पोपचा मृत्यू तुरुंगात झाला तर सहा जणांची हत्या झाली. दंगलीत जखमी झाल्याने दोघांचा मृत्यू झाला तर एकाच छप्पर कोसळून मृत्यू झाला. पोपने राजीनामा देण्याच्या घटना मात्र दुर्मीळ आहे.
पोपपदाचा इतिहास तपासला असता पदाचा राजीनामा देण्याची घटना दुर्मीळ आहे. यापूर्वी १०४५ मध्ये पोप बेनेडिक्ट नववे यांनी आपले पद व प्रतिष्ठा जॉन ग्रेटियन या पुजाऱ्याला विकली. लग्न करायचे असल्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले जाते. त्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या ग्रेटियन यांना १०४६ मध्ये पदावरून दूर व्हावे लागले. बेनेडिक्ट नववे यांनी त्यांची पदावरून हकालपट्टी केली. पदाचे पावित्र्यभंग केल्याचा आरोप ग्रेटियनवर ठेवण्यात आला होता. त्यानंतर १२९४ मध्ये पोप सेलेस्टाइन पाचवे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या पाचव्या महिन्यात त्यांनी या पदाचा राजीनामा देत असल्याचे प्रतिज्ञापत्र धर्ममंडळापुढे सादर केले होते. आपल्याला बंधमुक्त जीवन जगायचे असल्याचे कारण त्यांनी त्यासाठी दिले होते. मात्र, त्यांचे उत्तराधिकारी बोनीफेस आठवे यांनी त्यांचा हा अधिकार नाकारत त्यांना तुरुंगात डांबले. तेथेच सेलेस्टाइन यांचा मृत्यू झाला. १४१५ मध्ये तत्कालीन पोप ग्रेगरी बारावे यांनी कॅथलिकांमधील वादाला पूर्णविराम देण्यासाठी पदाचा राजीनामा दिला. त्यावेळी दोन पोप असायचे. कॅथलिकांमध्ये फूट पडल्याने असे झाले होते. आपणच खरे पोप असा दावा केला जायचा. हा वितंडवाद मिटवण्यासाठी ग्रेगरी यांनी राजीनामा दिला. तब्बल ४० वर्षांनंतर हा वाद शमला. १८०४ मध्ये तत्कालीन पोप पायस सातवे यांनी पदाचा राजीनामा दिला, नेपोलियनला फ्रान्सचे राजेपद मिळाले तर आपल्याला तुरुंगात टाकले जाईल या भीतीपोटी यांनी पदाचा राजीनामा दिला होता. तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पायस बारावे यांनी नाझींनी आपले अपहरण केल्यास पुढे काय होईल हे सांगता येत नसल्याने आधीच राजीनामापत्रावर स्वाक्षरी केली होती.