एअर इंडियाच्या वैमानिकांनी व्यवस्थापनासोबत असहकार आंदोलन सुरू केल्यामुळे शुक्रवारी एअर इंडियाच्या अनेक विमानांचे उड्डाण लांबणीवर पडले. वैमानिकच उपलब्ध नसल्यामुळे दिल्लीहून लंडनकडे जाणारे एअर इंडियाचे एआय ११५ या विमानाचे उड्डाण आठ तासांपेक्षा जास्त वेळ रखडले आहे.
सूत्रांनी दिलेला माहितीनुसार, वैमानिकांच्या दर्जासंदर्भात सरकारने घेतलेल्या एका निर्णयाविरोधात वैमानिकांनी असहकार आंदोलन सुरू केले असून, अनेक वैमानिकांनी शुक्रवारी सामूहिक रजा टाकली. सरकारने वैमानिकांना ‘कामगार’ या संकल्पनेतून बाहेर काढले आहे. त्यामुळे या पुढील काळात वैमानिकांना संपावर जाता येणार नाही. वैमानिकांना मोठे वेतन आणि इतर भत्ते दिले जातात. त्यामुळे त्यांना ‘कामगार’ संकल्पनेमध्ये ठेवता येणार नाही, अशी सरकारची भूमिका आहे. मात्र, वैमानिकांनी याला विरोधा केला आहे. त्याचा परिणाम शुक्रवारी विमान सेवेवर झाला. मुंबई-दिल्ली या दरम्यानची एअर इंडियाची अनेक उड्डाणेही यामुळे अनेक तासांपासून रखडली आहे. अनेक प्रवाशांनी याबद्दल संताप व्यक्त केला आहे.