ऑनलाईन शॉपिंग क्षेत्रातील भारताची मातब्बर कंपनी असलेल्या फ्लिपकार्ट आणि खासगी सेवा देणारी ओला या दोन कंपन्यांनी मोदी सरकारकडे मदतीचा हात मागितला आहे. फ्लिपकार्टचे सचिन बन्सल आणि ओलाच्या भाविश अगरवाल यांनी भारतीय कंपन्यांना अनुकूल धोरणे असावीत, असे आवाहन सरकारकडे केले आहे. परकीय मालकीच्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी या कंपन्यांनी राष्ट्रवादाचा आधार घेतला आहे. इकॉनॉमिक टाईम्सने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

‘जे चीनने १५ वर्षांपूर्वी केले, तेच आता आपल्या सरकारने अशी आमची इच्छा आहे. आम्हाला तुमच्या भांडवलाची गरज आहे. मात्र तुमच्या कंपन्यांची आवश्यकता नाही, असा संदेश सरकारने जगाला द्यावा, असे आम्हाला वाटते,’ असे फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बन्सल यांनी कार्नगे इंडिया ग्लोबल टेक्नॉलॉजी समिटमध्ये म्हटले आहे.

अमेरिकेच्या अॅमेझॉन आणि उबरसारख्या बलाढ्य कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सरकारने सहकार्य करावे, अशी मागणी बन्सल आणि अगरवाल यांनी केली आहे. ‘आमच्या क्षेत्रात भांडवल अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र वस्तू आणि सेवांच्या किमतींच्या संघर्षामुळे अमेरिकी कंपन्यांसोबत स्पर्धा करताना नुकसान सहन करावे लागते,’ अशी व्यथा भारतीय कंपन्यांच्या संस्थापकांनी बोलून दाखवली.

‘आमच्या क्षेत्रांमध्ये नाविण्यपूर्ण सेवा हा महत्त्वाचा विषय आहे. त्यामध्ये आम्ही अमेरिकन कंपन्यांना समर्थपणे टक्कर देत आहोत. मात्र मुख्य मुद्दा भांडवलाचा आहे. भांडवलाच्या कमतरतेमुळे मोठे नुकसान होते आहे,’ असे ओलाचे सीईओ अगरवाल यांनी म्हटले आहे.

भारतीय कंपन्यांना सरकारने संरक्षण देण्याची मागणी उद्योजक आणि गुंतवणूकदारांकडून बऱ्याच कालावधीपासून केली जाते आहे. मात्र पहिल्यांदाच भारतीय कंपन्यांच्या संस्थापकांनी ही मागणी जाहिरपणे बोलून दाखवली आहे. फ्लिपकार्ट आणि ओला या दोन्ही कंपन्या त्यांच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा पुढे आहेत. अॅमेझॉन आणि उबर या परदेशी कंपन्या बाजारात उशिरा दाखल झाल्याने त्या भारतीय कंपन्यांपेक्षा मागे आहेत.

ओला आणि फ्लिपकार्ट कंपनीच्या संस्थापकांनी यावेळी सुरक्षेच्या मुद्यालादेखील स्पर्श केला. ‘भारतीय कंपन्यांनी देशांतर्गत बाजारपेठेवर वर्चस्व गाजवल्यास सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही. आमच्या सर्व व्यवहारांवर सरकारची नजर असल्याने सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होणार नाही. मात्र अॅमेझॉन आणि उबरने बाजारपेठ काबीज केल्यास तसा प्रश्न निर्माण होऊ शकतो,’ असे ओला आणि फ्लिपकार्टच्या संस्थापकांनी म्हटले. अॅमेझॉन आणि उबरची डाळ चिनी कंपन्यांसमोर शिजलेली नाही. त्यामुळे आता या कंपन्यांना भारतीय बाजारपेठेवर वर्चस्व मिळवणे, अतिशय आवश्यक असल्याचे ओला आणि फ्लिपकार्टच्या संस्थापकांनी सांगितले.

ओला आणि फ्लिपकार्टच्या संस्थापकांनी राष्ट्रवादाचा मुद्दादेखील उपस्थित केला. ओला आणि फ्लिपकार्ट या भारतीय कंपन्या आहेत. ओला कंपनीची नोंदणी भारतातच करण्यात आलेली आहे, तर फ्लिपकार्टची नोंदणी सिंगापूरमध्ये करण्यात आली आहे. या कंपन्यांचे व्यवस्थापन भारतीयांकडूनचे पाहिले जाते, असेही ओला आणि फ्लिपकार्टच्या संस्थापकांनी म्हटले आहे.