फ्लोरिडामधील नाईटक्लबमध्ये गोळीबार झाला.  या गोळीबारात आतापर्यंत २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर  १४ ते १६ जण  जखमी झाल्याचे समजते आहे.  फ्लोरिडामधल्या क्लब ब्लूमध्ये हा गोळीबार झाला. सोमवारी रात्री १२.३० च्या सुमारास हा गोळीबार झाल्याचे समजते.  या क्लबमध्ये अल्पवयीन मुलांची पार्टी सुरू होती. मिळालेल्या माहितीनुसार, ही मुले १२ ते २७ वयोगटातील असल्याचे समजते आहे. या क्लबच्या गाड्या पार्क करण्यात येण्याच्या ठिकाणी गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अंदाधुंद गोळ्या चालवल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना शेजारच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातल्या एकाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे समजते आहे, जखमींची संख्या पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भिती पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

या गोळीबारामुळे परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी चौकशीसाठी अनेकांना ताब्यात घेतल्याचेही वृत्त आहे. गोळीबारामुळे या परिसरात पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. तसेच अधिक तपासासाठी हा भाग बंद करण्यात आला आहे. स्थानिकांनी इथल्या वृत्त वाहिन्यांना दिलेल्या माहितीनुसार त्यांनी ३० ते ३५ वेळा गोळीबाराचे आवाज ऐकले. या गोळीबारामागे कोण आहे हे अद्याप समजू शकले नाही. पोलिस हल्लेखोराचा तपास करत आहे. सहा आठवड्यापूर्वी फ्लोरिडा शहरातल्या ओरलॅण्डोमधील एका नाईट क्लबमध्ये ओमर मती नावाच्या हल्लेखोराने गोळीबार केला होता. या गोळीबारात ५० जणांचा मृत्यू झाला होता. ओरलॅण्डो गोळीबाराच्या जखमा ओल्या असतानाच नाईटक्लबरील दुस-या हल्ल्य़ाने फ्लोरिडा शहर पुन्हा हादरले आहे. अमेरिकेत सातत्याने गोळीबाराचे प्रकार वाढत चालले आहे. या गोळीबाराच्या घटनेमुळे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी देखील चिंता व्यक्त केली होती.