पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किमतींवरून विरोधी पक्षाच्या निशाण्यावर असलेल्या केंद्र सरकारने बुधवारी पलटवार केला. कॅबिनेटच्या बैठकीनंतर केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अर्थमंत्री अरूण जेटली यांनी महागाईबाबत शंखनाद करणाऱ्या काँग्रेस आणि डाव्या पक्षावरच हल्लाबोल केला. पेट्रोलवर काँग्रेस आणि डाव्यांचे सरकार कमाई करत असल्याचे सांगत राज्य सरकारे पेट्रोलवरील केंद्रीय कराचा आपला हिस्सा घेणार नाही का?, असा सवाल त्यांनी विचारला.

पेट्रोलच्या दराबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना जेटली म्हणाले, पेट्रोलचा वारंवार उल्लेख केला जात आहे. जिथे विरोधी पक्षांचे राज्य सरकार आहे. ते किती कर घेत आहेत. लक्षात ठेवा जेव्हा २ वर्षांपूर्वी तेल कंपन्या दर १५ दिवसाला किमतीचे मूल्यांकन करत असत. त्यावेळी अनेकवेळा आम्ही किमती कमी करत. पण जेव्हा आम्ही किंमत कमी करत. त्याचदिवशी संध्याकाळी दिल्ली, हरयाणा, पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये व्हॅटमध्ये वाढ केली जात. विशेष म्हणजे केंद्राकडूनही त्यांना पेट्रोलमधून कर मिळतो. त्याचप्रमाण प्रत्येक राज्याला ४२ टक्के इतका वाटा जातो. आता काँग्रेस आणि डाव्या सरकारांनी सांगावं की त्यांना केंद्राकडून कर नकोय म्हणून.

पेट्रोलवरील कर कमी करण्यावरून ते म्हणाले, सध्याच्या परिस्थितीचा सर्वांनी विचार करायला हवा. सध्या अमेरिकेत चक्रीवादळ आले आहे. त्यामुळे जगातील तेल कंपन्यांची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे मागणी व पुरवठा विस्कळीत झाला आहे. ही अस्थायी स्वरूपाची स्थिती आहे.

कोणताही देश चालवायचा म्हणजे महसूल हवा. महामार्ग कसे बनतील, मुलभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवली पाहिजे. सामाजिक स्वास्थाच्या योजनांचा निधी वाढवण्यात येत आहे. आम्ही या गुंतवणूकीत कपात करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.

महागाईबाबत बोलताना ते म्हणाले, आज महागाईवरून गोंधळ घालणारे जेव्हा सत्तेत होते, तेव्हा यापेक्षाही अधिक महागाई होती. मी हे स्पष्ट करू इच्छितो की महागाईबाबत बोलणारे हे लोक जेव्हा सत्तेत होते. तेव्हा १० आणि ११ टक्के महागाईचा दर होता. तो आज ३.२ टक्के इतका असूनही ते आमच्यावर टीका करत आहेत.